
भुपेंद्र अंबावने, मुंबई: जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील फेणे गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिवंडी शहरातील फेणे गाव या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली असून पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आले आहे. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.
फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (वय 32) व मुली नंदिनी (वय 12),नेहा (वय 07) व अनु (वय 04) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगल वर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत. घटनास्थळी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी मिळाली आहे.नक्की महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट नसले तरी पोलिस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत.
(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world