
भुपेंद्र अंबावणे, प्रतिनिधी
Bhiwandi conversion racket : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी परिसरात गरीब आणि वनवासी बांधवांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा (Baptism) देण्याचा कार्यक्रम सुरू असताना, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धाव घेऊन हा मोठा कट उधळला. याप्रकरणी पोलिसांनी एका अमेरिकन नागरिकासाह एकूण 3 जणांना अटक केली आहे.
काय आहे प्रकार?
हा संपूर्ण प्रकार 3 ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील भुईशेत, चिंबी पाडा या ठिकाणी घडला. धर्मांतराचे काम करणारा जेम्स वॉटसन (James Watson) हा अमेरिकन नागरिक त्याच्या स्थानिक साथीदारांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये मशिदीबाहेर तुफान राडा; नमाज पठणावरून दोन गट भिडले! 'हे' होतं कारण )
ही माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते संदीप भगत आणि दादा गोसावी यांनी स्थानिक पोलिस पाटलांच्या मदतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी धाव घेतली. भुईशेत गावात मनोज गोविंद कोल्हा यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हा प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोपी हिंदू धर्मातील देवी-देवतांवर आणि रुढी-परंपरांवर टीका करत होते. तसेच, मंतरलेले तेल (consecrated oil) लावल्यास आणि येशूची प्रार्थना (Jesus' Prayer) केल्यास आजार बरे होतात, अशी बतावणी करून गोरगरीब वनवासी बांधवांना धर्मांतरासाठी आमिष दाखवले जात असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. आरोपींकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणावर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
अमेरिकन नागरिक सूत्रधार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ गणपती सर्पे, ठाणे (पश्चिम) येथील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारा 58 वर्षीय जेम्स वॉटसन (मूळ अमेरिकेचा नागरिक) आणि मनोज गोविंद कोल्हा हे गावात महिला, पुरुष आणि मुलांना प्रार्थना करण्यासाठी, धार्मिक पुस्तकांमधून वाचन करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी एकत्र करत होते.
जेम्स वॉटसन हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधारअसल्याचे बोलले जात आहे. तो सन 2016 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आला आणि नंतर बिझनेस व्हिसा मिळवून भारतातच ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचे काम करत होता. कोणताही अधिकृत व्यवसाय न करता तो अनेक वर्षांपासून हे काम करत होता, असा आरोप संदीप भगत यांनी केला आहे.
स्थानिक रहिवासी रविनाथ सावजी भुरकुट यांनी हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. घटनेची खात्री झाल्यावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत घटनास्थळावरून साईनाथ गणपती सर्पे, जेम्स वॉटसन आणि मनोज गोविंद कोल्हा यांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. तिघांविरुद्ध महाराष्ट्र मानवी बलिदान आणि इतर अमानवी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि निर्मूलन कायदा (Maharashtra Anti-Superstition and Black Magic Act) आणि परदेशी कायदा (Foreigners Act) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world