भुपेंद्र आंबवणे, भिवंडी
Bhiwandi Food Poisoning: भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्या नंतर एका कुटुंबातील ६ व इतर असे एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाधित रुग्णांना मळमळ उलटी याचा त्रास जाणवू लागल्याने सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Good News: देशातील गॅस टंचाई पूर्णपणे संपली; जाणून घ्या सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?
चिकन शोरमा,पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना अन्नातून विषबाधा
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरातील फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा,पिझ्झा खरेदी करून काल रात्री घरी नेऊन खाल्ले होते. त्यानंतर आज सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागले. दुपारनंतर त्रास जास्त वाढल्या नंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी,मळमळ,जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती.
रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे. या घटनेतील रुग्णांमध्ये ६ पुरुष,६ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सफीक अन्सारी (३८), रुबीना बानो (३२), मरियम अन्सारी (११), अर्शिया अन्सारी (३), अरबाज अन्सारी (२७), शहाबाज अन्सारी (२६), जिनत अन्सारी (२४),आसिफ सय्यद (३०),नाजमीन सय्यद (२६),अन्वर सय्यद (३३), अफसाना सय्यद (५५),सना सय्यद (२५), तबसुम अन्सारी (२३) आणि अब्बास सय्यद (५) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शांतिनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
( नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )