भुपेंद्र अंबवणे, भिवंडी: भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातील कामवारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय सूरज तिवारी या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसां पासून बेपत्ता असलेला सूरज अखेर नदीपात्रात मृतावस्थेत सापडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सूरज तिवारी (वय 14) हा दोन दिवसांपूर्वी ट्युशनला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस तपासात उघड झालं की, सूरज आपल्या तीन मित्रांसोबत कामवारी नदीत पोहायला गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे सूरज बुडाला. ही घटना पाहून घाबरलेल्या मित्रांनी कोणालाही काही न सांगता तेथून पलायन केले.
दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांच्या चौकशीनंतर मित्रांनी खरी घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीय आणि अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली. तब्बल 48 तासांच्या शोधानंतर सूरजचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.
VIDEO : बॅडमिंटन खेळताना विजेचा शॉक; 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
दुसरीकडे, मुरुड तालुक्यातील बोर्ली गावांच्या हद्दीतील फणसाड डॅम च्या हद्दीत मुंबई तील अंधेरी मधील 11 जणांचा ग्रुप फिरायला आला होता. त्यातील काही जण डॅम मध्ये पोहण्यास उतरले. त्यातील साहिल राजू रणदिवे, वय 24 याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, त्याच्या मित्रानी त्याचा शोध घेतला परंतु न सापडल्याने पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले व शोध घेतला असता सदर युवकाची बॉडी डॅमच्या 38 फूट खोल पाण्यातून फ्री स्टाईल ड्रायव्हिंग पद्धतीने बाहेर काढण्यात आली.