petrol pump rumor : इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतली युद्धाचा अद्यापही विराम झालेला नाही. परिणामी राज्यातील अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिजेलबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान एका अफवेमुळे जळगाव, नंदुरबार आणि चंद्रपुरातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
जळगावात पेट्रोल पंपाबाहेर मोठी गर्दी...
जळगाव शहरात पेट्रोल पंपांवर आज अचानक मोठी गर्दी झाली असून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. परिणामी पेट्रोल पंपाबाहेर चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल चालकांसाठी नवे नियम लागू केल्याने काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचे टँकर उशिरा पोहोचत असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे पंप चालकांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
चंद्रपुरात पेट्रोल संपल्याची अफवा...
चंद्रपुर शहरात पेट्रोल संपल्याची अफवा पसरल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. मागील ८ तासापासून दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांनी पेट्रोल व डिझल घेण्यासाठी वाहनांचा पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहे. चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंप पाच दिवस बंद राहणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
समाज माध्यमांवरील अफवेने नागरिकांमध्ये गोंधळ
इराण-इस्राईल युद्धामुळे संपूर्ण देशभरात पेट्रोल डिझेल आणि एलपीजी सिलेंडरबाबत संभ्रम आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रकार आज नंदुरबार जिल्ह्यात देखील घडला आहे. जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा शहरात समाज माध्यमांवर पेट्रोल आणि डिझेल फक्त आजच्याच दिवस मिळणार असून उद्यापासून पेट्रोल, डिझेल मिळणार नसल्याची अफवा पसरली. यामुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करू लागले. मात्र पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा देखील सुरळीत असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र तरी देखील नागरिक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवरती गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.