विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या छप्परफाड यशानंतर ईव्हीएमवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत आज महाविकास आघाडीने मारकडवाडीत सभा घेतली. दरम्यान या प्रकरणात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंनी शंका उपस्थित केली आहे.
नक्की वाचा - शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना अवघी 92 मतं मिळाली होती. मात्र मला किमान 200 मतं अपेक्षित होती, 92 मतं कशी पडली असा सवाल बिचुकलेंनी उपस्थित केला आहे. मी बारामतीत गेलो तेव्हा कित्येक लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे हजारांपैकी केवळ 200 मतं तरी मिळायला हवी होती असं सांगत विधानसभेत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप बिचुकलेंनी केला आहे. 'ईव्हीएम' विरोधात शरद पवार जर लढा उभारणार असतील तर त्यांच्यासोबत या ईव्हीएम लढ्यामध्ये मी सामील असेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले, 'मी राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम दिलंय. लोक माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात, मग माझी मतं जातात कुठं? 'भविष्यातला महाराष्ट्राचा बुलंद आवाज फक्त अभिजित बिचुकले'.
गेल्यावेळी अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बिचुकले बारामतीतून उभे राहिले होते. येथून त्यांना 92 मतं मिळाली आहेत. तर नोटाला त्यांच्यापेक्षा सात टक्क्यांनी अधिक म्हणजे 700 मतं मिळाली आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत ते साताऱ्यातून उभे राहिले होते. येथे त्यांना 1395 मतं मिळाली होती.