जाहिरात

शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना, मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावे. या गाकऱ्यांचे म्हणणे ऐकावे असं आवाहन शरद पवारांनी केलं.

शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?
सोलापूर:

शरद पवारांनी मारकडवाडीत जाऊन तिथल्या गावकऱ्यांबरोबर संवाद साधला. तुमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे त्या शंकांचे निरसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत  हा विषय लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे देशाच्या लक्षात आले नाही ते गावकऱ्यांच्या लक्षात आले असंही यावेळी शरद पवार म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचताना, मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावे. या गावकऱ्यांचे म्हणणे ऐकावे. त्यात काही तथ्य असेल तर त्यांना न्याय द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला. हे करणं योग्य नाही. ते करणं योग्य नाही. मी काय चुकीचं केलं? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे का? तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे का? तुमच्या मनात शंका आहे. त्याची निरसन करणं हे चुकीचं आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. लोकांचे अधिकार काय आहेत. लोकशाही कशासाठी आहे. असे प्रश्न त्यांनी केले.  मी मुख्यमंत्र्यांना सांगतो इथे राजकारण करायचं नाही. लोकांच्या मनातली शंकेचं निरसन करायचं आहे. निवडणूक यंत्रणे बाबतचा संशय निर्माण होत आहे. यात राजकारण यायला नको. त्यांनी मला सल्ला दिली मी त्यांना सांगतो त्यांनी स्वत:या गावात यायला पाहिजे. लोकांचे म्हणणे ऐकले पाहीजे. त्यात तथ्य असेल तर निर्णय घेतला पाहीजे असे आव्हानच फडणवीसांना दिले. 

ट्रेंडिंग बातमी - कानडी अत्याचार! बेळगावात मराठी मेळाव्याला कर्नाटक सरकारची बंदी, महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही अडवणार

जगातल्या प्रमुख देशांनी ईव्हीएम नाकारलं आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होतं. आपल्याकडची  निवडणूक पद्धत बदलली पाहीजे. त्यासाठी मारकडवाडीनं आवाज उठवला. तुम्ही बॅलेटवर मतदानाचा निर्णय घेतला. पण  पोलिसांनी तुम्हाला बंदी केली. हा कोणता कायदा आहे? असा प्रश्न त्यांनी केला. उद्या तुम्ही मला भाषण करायला बंदी कराल, तुम्हाला भाषण ऐकायला बंदी घातली जाईल. असा कोणता कायदा आहे का? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला. तुमच्या गावात जमायला तुम्हालाच बंदी हा काय प्रकार आहे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?

तुम्ही उठवलेला आवाज दिल्लीपर्यंत ऐकू गेला आहे. तुमचा प्रश्न मी स्वत: राज्यसभेत मांडणार आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण तालुक्यात, सर्व गावात ठराव करा. ईव्हीएममध्ये मतदान नको. पहिल्यासारख मतदान द्या. त्याची माहिती आम्हाला द्या. ती आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू असंही ते म्हणाले. जो पर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तुम्ही स्वस्थ बसू नका. ईव्हीएम विरोधात जनलढा उभा राहण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.   

ट्रेंडिंग बातमी - 'बाळासाहेबांनी दगडाला शेंदूर फासला, त्याचा माजा उतरवायचा होता'

शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मारकडवाडी हे गावही याच मतदार संघात येतं. याची आठवण यावेळी शरद पवारांनी आवर्जून सांगितली. मी या मतदार संघातून लोकसभेला उभा होता. त्यावेळी तुम्ही मला न मागता मतं दिली होती. मी प्रचंड मतांनी विजयी झालो होतो. तेव्हा मतं दिली त्याचे आभार आता मानतो, असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधणार. तुम्ही काळजी करू नका असे पवार यावेळी म्हणाले. शिवाय तुम्ही उपस्थित केलेली शंका योग्य आहे. संपूर्ण राज्यात अशीच स्थिती आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com