आकाश सावंत, बीड
बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला बिंदुसरा तलाव यंदा मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे. मागील अनेक वर्षांपासून या कालावधीत तलाव कोरडा पडतो. मात्र यंदा वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सदरीवरून बिंदुसरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मे महिन्यात तलाव भरून वाहतोय हे आश्चर्यकारक असून, शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, तलाव भरून वाहू लागला असून बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला नवजीवन मिळाले आहे.
(नक्की वाचा- Rain Alert: विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज; उर्वरित महाराष्ट्रात 'टाईम प्लीज')
बिंदुसरा तलाव हे केवळ पाणीपुरवठ्याचेच नव्हे, तर शहराच्या भूजल पातळीच्या संतुलनासाठीही महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. तलाव भरून वाहू लागल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई भासत नाही, अशी अपेक्षा प्रशासन आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
थोट नदीला पूर, पंधरा गावांचा संपर्क तुटला
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वडवणी तालुक्यातील थोट नदीला पूर आला आहे. यामुळे तब्बल 15 गावांचा संपर्क तुटला आहे. काल दुपारपासून वडवणी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील सर्वात नदी आणि वडे ओव्हरफ्लो झाले आहेत. नदीला पूर आल्याने पिंपळनेर बीडकडे जाणाऱ्या पंधरा मुख्य गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवडी देवगाव, काडीवडगाव, सांडरवन लिंबारुई , पिंपळनेर कडील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.