अविनाश पवार
कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्यानंतर, भाजप आमदार महेश लांडगे यांनी या भूमिकेवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नाही. गोरक्षक धर्म आणि गोमातेच्या रक्षणासाठी काम करतात. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन केले जाणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कुरेशी समाजाच्या प्रश्नांवर झालेल्या बैठकीत, पोलिसांना ‘गोरक्षकांना आवरा' अशा सूचना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगण्यात येत आहे.
( नक्की वाचा: स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 37 वर्षे जुना, भाजपचा अजित पवारांनाही टोमणा )
महेश लांडगे काय म्हणाले?
इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढी व समाधीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत झालेल्या सकल हिंदू समाजाच्या रास्ता रोको आंदोलनात, महेश लांडगे यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले. ‘‘एखादा जिहादी, कुरेशी जातो आणि सांगतो की गोरक्षक आमचे नुकसान करतात… त्यांना काय अडचण आहे? जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत आणि गोमातेचे रक्षण सुरूच ठेवणार आहोत,'' असे ते म्हणाले. लांडगे यांनी पुढे लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसारख्या मुद्द्यांवरही कठोर भूमिका घेतली. ‘‘भाजपा महायुतीचे सरकार हिंदुत्ववादी आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही,'' असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष सुरू असून, आता गोरक्षणाचा मुद्दा या संघर्षात नव्याने भर घालत आहे.
( नक्की वाचा: "खड्डेमुक्त रस्ता दाखवा 10 हजारांचं बक्षीस मिळवा", भाजप पदाधिकाऱ्यांचे केडीएमसीला आव्हान )
मागे हटायचे नाही, लांडगेंनी ठणकावले
महेश लांडगे म्हणाले की, विशेषत: गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या. आपण धर्माचे आणि आपल्या गोमातेचे रक्षण करतोय. गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले तर आम्ही सहन करणार नाही. गोरक्षक म्हणजे घरात चिंचोके खेळणे नाही. जे गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत, चुकीच्या बातम्या देतायत त्यांना सांगणे आहे, गोमातेचे रक्षण करण्यासाठी एखाद्या ट्रकचा पाठलाग करा, तुम्हाला कळेल की गोरक्षक काय असतो. कोणी गोरक्षणापासून मागे हटायचे नाही, लव्ह जिहादपासून हटायचे नाही, लँड जिहादपासून हटायचे नाही.