जाहिरात

स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 37 वर्षे जुना, भाजपचा अजित पवारांनाही टोमणा

Meet Shop Ban Row: कत्तलखाने बंदीचा निर्णय आजचा नसून 1988 सालापासून हा निर्णय अंमलात आला असल्याची आठवण भाजपने विरोधकांना करून दिली आहे.  

स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 37  वर्षे जुना, भाजपचा अजित पवारांनाही टोमणा
मुंबई:

15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय काही महानगरपालिकांनी घेतला आहे. कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अमरावती महापालिकांनी अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयावरून महाराष्ट्रात सध्या वादंग निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपवर टीका करताना विरोधकांनी म्हटले आहे की,  लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हेदेखील आता सरकार ठरवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे या प्रकरणी बरेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यास सुरुवात केली असून कत्तलखाने बंदीचा निर्णय आजचा नसून 1988 सालापासून हा निर्णय अंमलात आला असल्याची आठवण भाजपने विरोधकांना करून दिली आहे.  

( नक्की वाचा: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा )

अजित पवारांना टोमणा

विरोधकांना आठवण करून देत असतानाच भाजपने त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांनाही टोमणा हाणला आहे. अजित पवारांनी 15 ऑगस्ट रोजी मांसाहारावर बंदी घालणे योग्य नसल्याचे म्हटले होते. याबद्दल  बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी X पोस्टद्वारे म्हटले आहे की, "प्रशासनावर उत्तम पकड असणाऱ्या तसेच महायुतीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या व आता 15 ॲागस्टच्या मांसबंदीच्या निर्णयाला विरोध नोंदविणाऱ्या अजित पवार यांनाही हा निर्णय महायुती सरकारमध्ये झालाच नाही याची माहिती असणारच याबद्दल शंका नाही."

भाजपच्या केशव उपाध्ये यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये विरोधकांवर सडकून टीका करताना म्हटले आहे की,"काय खावे काय खाऊ नये, याचा निर्णय सरकारने करूच नये या बद्दल दुमत नाहीच फक्त विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपाची भूमिका आहे. 15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे व जितेंद्र आव्हाड हे 15 ॲागस्ट कत्तलखाना बंदी साठी शरद पवारांचा निषेध करणार का? विरोध करणार का? त्यांना जाब विचारणार का? हा खरा प्रश्न आहे."

( नक्की वाचा: एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार; काय आहे निमित्त? )

केशव उपाध्ये यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, " 15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नसून 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना व कॅाग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर महिनाभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा 15 ॲागस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला. एवढंच काय मविआ सरकारमध्ये 2/3 वर्षांपूर्वी हे दोघेही मंत्री असतानासुध्दा १५ ॲागस्ट ला कत्तलखाने बंद ठेवण्यात आले होते, तेव्हा त्या विरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाहीत. पण जितेंद्र आव्हाड व आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असे म्हणणार नाही. कारण पक्ष व सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावून नैराश्यात असलेल्या आव्हाड व ठाकरेंकडून अर्थात सरकारच्या प्रत्येक कृती विरोधात बोलण्याव्यतिरक्त वेगळी अपेक्षाच जनता करीत नाही. महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो असे म्हटले तरी हे लोक त्याला विरोध करतील. "

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com