Amravati News: "काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात!", आमदार प्रवीण पोटेंची राणा दाम्पत्यावर तुफान फटकेबाजी

Amravati Political News: भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा समर्पण दशक' सोहळ्यात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी व्यासपीठावरून तुफान बॅटिंग करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आमदार पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या 'राणा दाम्पत्या'चे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.

"हजार झाडे लावताना नाकात दम आला"

आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत बोलताना आमदार प्रवीण पोटे म्हणाले, "मी स्वतः 1 हजार वृक्ष लागवड करताना माझ्या नाकात दम आला होता. पण इथे काही लोकांनी भलतेच आकडे फुगवून सांगितले. तोंडात येईल तसं बोलून दाखवलं!" असा थेट टोला त्यांनी राणा दाम्पत्याच्या वृक्षारोपण दाव्यांवर लगावला.

Advertisement

"रेल्वे बोंडेंनी आणली, पण उदो-उदो दुसऱ्यांनीच केला"

पंढरपूर रेल्वेच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्याच्या प्रसिद्धीच्या स्टंटवर बोट ठेवत पोटे पुढे म्हणाले, "डॉ. अनिल बोंडे खासदार असताना त्यांनी विशेष प्रयत्न करून पंढरपूरची रेल्वे सुरू केली, पण दुर्दैवाने हे आम्हाला जास्त सांगता आलं नाही. परंतु, ज्यांनी ही रेल्वे आणलीच नाही, त्यांनी मात्र स्वतःच याचा मोठा उदो-उदो करून घेतला."

"जे नवीन येऊन फुगड्या खेळत आहेत, शेला आधी त्यांच्या अंगावर टाका"

पक्षातील नवीन प्रवेशांवर आणि प्रसिद्धीवर भाष्य करताना आमदार पोटे आक्रमक झाले. ते म्हणाले, "आज कार्यक्रमाला येताना काही कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर भाजपचा शेला टाकण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखत स्पष्ट सांगितलं की, माझं रक्तच मुळात भाजपचं आहे. जे नवीन पक्षात येत आहेत आणि फुगड्या खेळत आहेत, त्यांच्या अंगावर आधी शेला टाका. केवळ पेपरला पत्र देऊन बातम्या छापण्याची आमची सवय नाही, आम्ही प्रत्यक्षात काम करणारी माणसे आहोत."

आमदार प्रवीण पोटे यांनी खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासमोरच मारलेल्या या जोरदार राजकीय फटक्यांमुळे अमरावती भाजप आणि राणा दाम्पत्यामधील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पुढे आला आहे.

या भव्य सोहळ्याला भाजप आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आमदार रमेश बुंदिले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Advertisement

Topics mentioned in this article