सागर कुलकर्णी, मुंबई: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहेत.
आशिष शेलार यांची महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्षपद रिक्त झाले आहे. या पदासाठी मुंबईतील भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम यांच्यासह अनेक जण इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यांपैकी प्रविण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर हे मंत्री पदासाठी आग्रही होते. पण मंत्रिपद मिळाले नाही तर किमान मुंबई भाजपा अध्यक्षपद पदरात पडावे यासाठी या नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. याठिकाणी आता भाजपकडून कोणाचे नाव फायनल होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन भाजप पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावर भाजपकडून महत्त्वाच्या नेत्याला जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर
त्याचबरोबर प्रविण दरेकर यांचीही भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारीअखेर भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.