अभय भुते, भंडारा
Bhandara News: भंडारा तालुक्यातील पेट्रोलपंप ठाणा ग्रामपंचायत हद्दीतील विवेकानंद कॉलनी परिसरात आज सकाळच्या सुमारास जादूटोणा (Black Magic) आणि करणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. या परिसरात राहणाऱ्या थोटे यांच्या घरापासून ते मेहेर यांच्या घरापर्यंत असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर काही अज्ञात व्यक्तींनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी हे अघोरी कृत्य केल्याचा संशय आहे.
नेमके काय घडले?
सकाळच्या वेळी एका तरुणाच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा त्याने याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. रस्त्यावर काढले रांगोळीवर लाल कुंकू आणि लिंबू ठेवलेले होते. यामुळे पेट्रोलपंप ठाणा परिसरात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
(नक्की वाचा- Social Media Rule: चीनचा ऐतिहासिक निर्णय! 'या' इन्फ्लुएन्सर्सच्या कंटेन्टवर येणार बंदी)
परिसरात भीतीचे वातावरण
विवेकानंद कॉलनी परिसर हा 'आयुध निर्माणी' परिसरातील सेवानिवृत्त आणि अत्यंत सुशिक्षित लोकांचा म्हणून ओळखला जातो. या गावातील अनेक युवक संरक्षण दलात, पोलीस, जिल्हाधिकारी, वकील, शिक्षक, तसेच आयुध निर्माणीमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. या गावाची ओळख सुशिक्षितांची वस्ती अशी असताना, गावात घडलेल्या या जादूटोणा, करणीच्या प्रकारामुळे कॉलनीतील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व स्तरांतून या अघोरी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
पोलीस करणार कारवाई
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे हे अघोरी कृत्य करणाऱ्यांचा आणि त्यांच्या नावाचा शोध सुरू आहे. या घटनेबद्दल जवाहर नगर पोलीस स्टेशनला विचारणा केली असता, पोलिसांनी सांगितले की त्यांना अद्याप याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.