सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या पटांगणात लिंबू, कुंकू आणि अंडी आढळून आल्याने शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. हे कृत्य कोणी केलं आणि त्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण...
टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उतारा करून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात लिंबू अंडी कुंकू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून टाकवे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आज सकाळी लिंबू, अंडी, कुंकू आणि कागदाचे तुकडे टाकून गोलाकार चिन्ह काढलेले आढळल्याने शाळेत खळबळ उडाली आहे. अचानक सापडलेल्या या वस्तूंमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती ग्रामपंचायत आणि पोलिसांना देण्यात आली असून, हे कृत्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर
मात्र अशा कृतीमुळे शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाने याबाबत ग्रामस्थांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले. यापूर्वीही टाकवे पंचायत निवडणुकीत लिंबांवर नावे लिहून खिळे टोचण्याचा प्रकार चर्चेत आला होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये नव्याने चिंता वाढली आहे.