Mumbai Municiple Corporation Election 2026: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईमध्ये महापौर कोणाचा? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने मुंबई पालिकेची सत्ता खेचून आणली आहे. या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकल्या असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसणार हे जवळपास फिक्स आहे.
अशातच एकनाथ शिंदेंच्या एका निर्णयाने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे कोणती नवी खेळी करणार? विरोधकांची मोट बांधत त्यांच्याकडे महापौरपद मिळवण्याचे काही मार्ग आहेत का? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबतच 'प्रहार'चे ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी यांनी महत्त्वाचे विश्लेषण केले आहे.
ठाकरेंचा महापौर होणार का? कसं जुळेल गणित?
" निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेली आकडेवारी आणि समीकरणे पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बसेल अशी अजिबात शक्यता नाही. मात्र ठाकरे हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. 25 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आता ठाकरेंना विरोधात बसावे लागणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी ते कोणतीही तडजोड करु शकतात, असं सचिन धानजी म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्याठी 114 हा बहुमताचा आकडा आहे. सध्या महायुतीकडे 117 नगरसेवक आहेत. उद्धव ठाकरेंनी जरी विरोधकांची मोट बांधण्याचे ठरवले तरी त्यांचा आकडा 108च्या आसपास आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी कोणतीही संधी नाही. मात्र एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी, त्यांचे मुंबईमधील वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी त्यांना विरोधात ठेवण्याचा विचार ठाकरे करु शकतात, असाही महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
शिंदे विरोधात, ठाकरे सत्तेत...?
"राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं हे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उद्धव ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर आहे. महत्त्वाचं म्हणजे याबाबत केंद्रही हाट झटकेल. आमच्यासाठी विधानसभा, लोकसभा महत्त्वाच्या आहेत, हा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा.. असे म्हणत केंद्रातून या निर्णयाला कोणताही विरोध होण्याची शक्यता नाही. आगामी काळात मुंबईमध्ये कोट्यवधींची विकासकामे होणार आहेत, या कामांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोध करेल. ठाकरेंच्या विरोधाचा सामना करण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना विरोधात ठेवून ठाकरेंना सत्तेत घेण्याचा विचार भाजप करु शकते. म्हणजे, सत्तेतही आपले आणि विरोधातही आपलेच.. अशी रणनितीही नाकारता येत नाही," असा मुद्दाही त्यांनी मांडला.