PMC Election 2026 Five Shocking Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व विरोधकांचा सुपडा साफ करत विजय खेचून आणला. पुण्यामध्ये 165 पैकी एकट्या भाजपने 90 जागा मिळवत सत्ता मिळवली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकत्र आलेल्या अजित पवार- शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर पुण्यातील भाजपच्या लाटेत अशा मातब्बर नेत्यांना भुईसपाट केले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
धंगेकरांना आंदेकरांचा दणका... मुलगा अन् पत्नी दोघेही पराभूत!
कसबा पेठेतील पोट निवडणुकीनंतर पुण्याच्या राजकारणात रविंद्र धंगेकर हे नाव प्रचंड चर्चेत आले. भाजपचा गड असलेल्या कसब्यात रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवत काँग्रेसला नवसंजीवनी दिली. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. अशातच मनपा निवडणुकीआधी धंगेकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र या निवडणुकीत धंगेकरानंतर त्यांची पत्नी अन् मुलाचाही पराभव झाला.
Raj Thackeray: 'काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं?' राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
रविंद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बीडकर यांच्यामध्ये सामना झाला. प्रभाग क्रमांक 24 मध्ये झालेल्या या लढतीत गणेश बीडकर यांनी धंगेकरांच्या मुलाचा पराभव झाला. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकरांनी धक्का दिला. प्रभाग क्रमांक 23 मध्ये सोनाली आंदेकर विरुद्ध प्रतिभा धंगेकर यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये सोनाली आंदेकरांनी विजय मिळवला.
वसंत मोरेंचा पराभव, लेकालाही पाडलं
पुणे मनपा निवडणुकातील दुसरी हायहोल्टेज लढत म्हणजे ठाकरेंचे फायरब्रँड नेते वसंत मोरे. पुणे मनपा निवडणुकीत वसंत मोरे यांनी आपला मुलगा रुपेश मोरेलाही लाँच केले होते. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोरे पिता पुत्रांसाठी सभा घेतली होती. मात्र कात्रजकरांनी वसंत मोरेंनाच कात्रजचा घाट दाखवला. प्रभाग क्रमांक 40 मधून भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरेंचा पराभव केला. वसंत मोरे हे स्वतः प्रभाग ३८ (हडपसर-कोंढवा बुद्रुक) मधून निवडणूक लढवत होते, त्यांचाही याठिकाणी 1011 मतांनी पराभव झाला.
रुपाली ठोबरेंना दोन्ही ठिकाणी पराभवाचा धक्का..
पुणे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पराभव स्विकारावा लागला. रुपाली ठोंबरे पाटील या प्रभाग क्रमांक 25 आणि 26 अशा दोन्ही प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. त्यांचा या दोन्ही ठिकाणी पराभव झाला. मतमोजणीदरम्यान त्यांनी ईव्हीएम मशिन्स बदलल्याचा आरोप करत आक्षेप घेतला. काही काळ याठिकाणी मतमोजणीही थांबली होती. मात्र अंतिम निकालात या दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्विकारावा लागला.
शहराध्यक्ष पराभूत, आंदेकर टोळी जिंकली
पुण्यामध्ये मनसेलाही मोठा धक्का बसला. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचाही पराभव झाला. दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घरातील दोन्ही उमेदवारांनी जेलमधून निवडणूक लढवत विजय मिळवला. आयुष कोमकर हत्या प्रकरणी जेलमध्ये असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. तर गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेचा पराभव झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world