BMC Election 2026: 'मराठी माणसा जागा हो...' ठाकरे गटात नाराजीनाट्य, आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने संताप

चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्येही असाच प्रकार समोर आला असून आयात उमेदवाराला संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधु एकत्र आल्याने पालिका निवडणुकांची रंगत वाढली आहे. अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचे वाटपही करण्यात आले आहे. पालिका निवडणुकांच्या उमेदवारीवरुन सर्वच पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्येही असाच प्रकार समोर आला असून आयात उमेदवाराला संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. 

आयात उमेदवाराला तिकीट, शिवसैनिकांमध्ये नाराजी...

समोर आलेल्या माहितीनुसार, चांदिवली विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 161 मधील उमेदवारीवरुन शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. चांदिवली प्रभाग क्रमांक ६१ मध्ये गेली ६ टर्म शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे या भागात शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे. मात्र ठाकरे गटाकडून एमआयएममधून आलेल्या आयात उमेदवाराला संधी दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज झाले आहेत. 

BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?

मागील निवडणुकीत निवडणूक लढवलेल्या एमआयएमचे नेते इमरान सय्यद नबी यांनी काल शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर तात्काळ त्यांना एबी फॉर्मही देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सर्वांना पक्षातीलच उमेदवाराला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र आयात उमेदवाराला तिकीट मिळाल्याने स्थानिक शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तशा सोशल मीडिया पोस्टही सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहेत. 

या उमेदवारीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार उमाकांत भानगिरे यांच्या फेसबूक पोस्टने लक्ष वेधले आहे. मराठी माणसा जागा हो, निष्ठा हरली, चांदिवली विकली. निष्ठावंत कार्यकर्ता हारला, मराठी माणसाकडे पैसे नाहीत, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 

Advertisement

कोणाकोणाला मिळाली संधी? 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर बोलावून  अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामध्ये सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, माजी आमदार श्रीकांत सरमळकरांचे जावई, तसेच विनायक राऊत यांच्या मुलालाही संधी देण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- TMC Election: ठाण्यात महाविकास आघाडीचा 'मास्टर प्लॅन'! अनेक चकीत करणारे निर्णय होण्याची शक्यता)