माझ्याकडे बॉम्ब अन् आरडीएक्स...', तरुणाची धमकी अन् प्रशासनाची तारांबळ; साताऱ्यात काय घडलं?

धमकीनंतर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॉम्ब तपासणी पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सातारा: 'माझ्याकडे बॉम्ब आरडीएक्स आहे. मी आता सगळं उडवून देणार आहे. मी एका महिलेचा खूनही करणार आहे..', असं म्हणत साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात एका तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. तरुणाच्या या धमकीने कर्मचाऱ्यांसह पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या धमकीनंतर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॉम्ब तपासणी पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर...

गुरुवार (ता. 5 डिसेंबर) दुपारची वेळ. साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर  शिवाजी विनायक दडस नावाचा युवक फिरत होता. फिरता फिरता तो जोरात पळून माझ्याजवळ बॉम्ब आहे असे म्हणू लागला. येणारे जाणारे वाहनधारक त्याला बघत होते पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. इतक्यात तो शासकीय विश्रामगृहाच्या गेटमधून आत गेला यावेळी रेस्ट हाऊस मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य बाहेर जाण्यासाठी निघाल्या. त्यांना पाहून तो माझ्याकडे बॉम्ब आरडीएक्स आहे. मी आता सगळं उडवून देणार आहे मी एका महिलेचा खूनही करणार आहे असे म्हणत दंगा करू लागला.

नक्की वाचा: पती- पत्नीने लेकीसह आयुष्य संपवलं; कारण ऐकून सगळेच सुन्न

 हे ऐकून महिला घाबरल्या, त्यांनी तात्काळ इतर सदस्यांना बोलावले आणि क्षणाचा विलंब न करता 112 क्रमांक डायल करून एक इसम बॉम्ब घेऊन घुसला असून विश्रामगृह उडवून देण्याची धमकी देत आहे असे सांगितले. तिथे पोलिसांचा फौजफाटा तात्काळ दाखल झाला त्यांच्यासह बॉम्ब तपासणी पथक अग्निशामक दल ही आले.

पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत अंग झडती घेतली, परंतु त्याच्याजवळ बॉम्ब किंवा आरडीएक्स असे काहीही नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या संपूर्ण प्रकरणाने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. घटनेनंतर पोलिसांनी  रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तो मानसिक विकलांग असल्याचे सांगितले. या प्रकाराची सध्या शहरभरात जोरदार चर्चा होत आहे. 

महत्वाची बातमी: खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी

दरम्यान, माझ्याजवळ बॉम्ब आहे असे सांगून दंगा करणारा शिवाजी दडस हा रायगड एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत होता. परंतु गतवर्षी पासून त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याला रायगड डेपोतून बदली हवी असताना ती होत नसल्याने तो तणावात आहे. तसेच त्याला दारूचे व्यसनही असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच तणावातून असे कृत्य करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement