Buldhana New :शिवरायांचा पुतळा हटवण्यावरुन वाद; अंगावरील कपडे फाटेपर्यंत महिलेला मारहाणीचा आरोप, 21 जणांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने स्थापित केलेला पुतळा हटवण्यासाठी दोन गटात वाद झाला. या वादाने हिंस्त्र रुप धारण केलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, हे छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखलं जातं. मात्र या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने स्थापित केलेला पुतळा हटवण्यासाठी दोन गटात वाद झाला. ज्यामध्ये माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला, पडसादही उमटले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 37 जणांवर गुन्हा दाखल करून 21 जणांना अटक केली आहे. सध्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे.

लोणार तालुक्यातील चिखला या गावातील ग्रामपंचायतच्या जागेमध्ये 3 फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा बसवला. मात्र गावातील विविध कार्यक्रमासाठी केवळ एकच जागा असल्याने आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने ती जागा योग्य नसल्याने गावातील पुतळा हटवण्यासंदर्भात एका गटाने प्रयत्न सुरू केले. प्रशासनाने देखील तसा कार्यालयीन पत्रव्यवहार केला. परंतु 20 फेब्रुवारी रोजी पुतळा हटवण्यासंदर्भात गावातील दोन गट समोरासमोर आले आणि वाद झाला. त्याचेच रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये संजीवनी वाघ या महिलेच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कपडे फाटलेल्या अवस्थेत या महिलेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

नक्की वाचा - Amravati News : अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा अडचणीत? किरीट सोमय्यांच्या बैठकीमुळे वाद

...तर 26 फेब्रुवारीला राज्यभरातील मराठा समाज चिखला गावामध्ये एकवटणार

मात्र पुरुषांनी बेदम मारहाण केली नाही, हा महिलांचाच वाद होता. हाणामारी झाली. मात्र महिलांनी देखील संजीवनी वाघ यांचे कपडे फाडलेले नाहीत. हे चुकीच्या पद्धतीने एका समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करू नयेत आणि दुसऱ्या गटाची देखील तक्रार घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ओबीसी समाजाने घेतली आहे. आज चिखला गावाजवळ हजारो ओबीसी समाज बांधव भगिनींचा सत्यशोधन मेळावा पार पडला. 25 फेब्रुवारीपर्यंत सर्व दोषींवर सांगितल्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले नाही, तर 26 फेब्रुवारीला राज्यभरातील मराठा समाज चिखला गावामध्ये एकवटणार आणि आंदोलन सुरू करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यावर भाजपचे प्रवक्ता आणि समाजाचे नेते विनोद वाघ यांनी देखील इशारा देत परस्परविरोधी तक्रार दाखल करावी आणि दुसऱ्या गटावर देखील गुन्हा दाखल करावा, अन्यथा आपण लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजाची सभा घेणार असल्याच विनोद वाघ यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाची भूमिका ठाम

काल २२ फेब्रुवारी त्याच ठिकाणी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा उभारण्यात आला. तर त्या जागेवरून पुतळा हलवणार नसल्याची भूमिका सध्या मराठा समाजाने घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे केवळ एकाच गटातील व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्याने ओबीसी समाज देखील आता आंदोलनात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यामधील तक्रारीनुसार मुख्य आरोपी असलेला सरपंच गणेश काकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापूर्वी त्यांनी समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया देत हा संपूर्ण प्रकार खोट्या पद्धतीने समोर आणल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दोन दिवसापासून चिखला गावामध्ये मराठा समाजाचे विविध पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होताना दिसत आहेत. त्यावर आता ओबीसी समाज देखील एकवटताना दिसत आहे. त्यामुळे आता हा वाद निवडण्यासाठी प्रशासनासह इतर लोकप्रतिनिधी कोण पुढाकार घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये वैयक्तिक वाद होता, सामाजिक वाद होता की काही राजकारण आहे. हे पोलीस तपासात समोर येणारच आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेला हा वाद निश्चितच महाराष्ट्राच्या अस्मितेला न शोभणारी म्हणावी लागेल.

Advertisement