शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati Municipal Corporation : अमरावती महानगरपालिकेत बनावट जन्मदाखले प्रकरणी झालेल्या बैठकीवरून आता राजकीय वाद चांगलाच चिघळला आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी महापालिकेत बैठक घेतल्यानंतर काँग्रेसने थेट महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने आयुक्तांना थेट पत्र लिहत या बैठकीसंदर्भात जाब विचारला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचा सौम्या शर्मांना सवाल...
अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी आयुक्तांना लेखी पत्र देत या बैठकीची वैधता, कायदेशीर आधार आणि प्रक्रियेबाबत सविस्तर खुलासा मागितला आहे. महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असताना कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्तीला अध्यक्षस्थानी बसवून बैठक घेण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा थेट सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे प्रशासनाने पक्षपाती भूमिका घेतली का, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
किरीट सोमय्यांची बैठक अडचणीत...
शेखावत यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत स्पष्ट विचारले आहे की, जर काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर किंवा माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अशाच प्रकारची बैठक घेतली, तर आयुक्त आणि पोलीस प्रशासन उपस्थित राहतील का? अशा बैठकीची वैधता काय असेल? असा प्रश्न उपस्थित करत बबलू शेखावत यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांच्या बैठकी संदर्भात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवाय, आगामी महापालिकेच्या होणाऱ्या सभेत या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आयुक्तांना घेरण्याच्याही तयारीत असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world