अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : मनाशी ठाम निश्चय असेल तर काहीही अशक्य नसतं. प्रतिकूल परिस्थितीतही इच्छाशक्तीतून तुम्ही असाध्य गोष्टीही साध्य करू शकता, हे दाखवून दिलंय बुलढाण्यातील एका चिमुरडीने. बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील दहा वर्षीय सिद्धी विठ्ठल सोनवणे या मुलीने एवरेस्ट बेस अवघ्या 11 दिवसात सर केला आहे. यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सिद्धीने वयाच्या पाच वर्षापासूनच रनिंग, मॅरेथॉन, कळसुबाई शिखर, केदार कंठा, कोकणकडा यासारखे विविध शिखर सर केले आहेत. त्यासाठी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद घेण्यात आली आहे.
आईचं निधन, वडिलांच्या आधारातून गाजवला पराक्रम...
सिद्धीने बुलढाणा जिल्ह्याचं नाव उंचावणारी कामगिरी केली आहे. लहाणपणीच आई तिला सोडून गेली. वडिलांचा जेमतेम आधार. घरातील सर्व कामं ती करते. अगदी स्वयंपाकही करते. धावणे, सराव, घर आणि शाळा सांभाळून हे सर्व पराक्रम गाजवणाऱ्या सिद्धीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. भविष्यात तिला देशाचं नाव शिखरावर न्यायचं असून त्यासाठी आफ्रिका खंडातील किलीमांजरो शिखर सर करायचं ध्येय तिने मनाशी बाळगलं आहे.
घरची परिस्थिती जेमतेम असताना देखील एवरेस्ट शिखर सर करण्यासाठी लागणारा तीन लाखाचा खर्च विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मिळून केला. समाजातील विविध मदतीचे हात एकत्र आल्याने सिद्धीने तिचं स्वप्न पूर्ण केलं. भविष्यात तिला कठीण मानला जाणारा आफ्रिका खंडातील किलीमांजरो शिखर सर करण्याची इच्छा आहे. यासाठी तिने मदतीचे हाक दिली आहे. किलीमांजरो शिखर आफ्रिका खंडातील सर्वात उंच सुप्त ज्वालामुखी पर्वत आहे. याची उंची १९,३४१ फूट इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाल्याची माहिती आहे.