अमोल सराफ, बुलढाणा:
Samruddhi Mahamarg Travel Bus Accident: ड्रायव्हर आणि क्लिनरच्या रिल्सच्या नादात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मेहकर येथील टोलनाकाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन पलटी झाली. या दुर्घटनेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झालेत. या धक्कादायक घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
समृद्धीवर मोठी दुर्घटना, खासगी ट्रॅव्हल्स उलटली
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर टोलनाक्याजवळ एका खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बसचा चालक आणि क्लिनर चालत्या गाडीत मोबाईलवर 'रिल्स' बनवण्यात मग्न होते, ज्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
ही खासगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन पलटी झाली आणि जवळच असलेल्या एका चारचाकी वाहनावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत दीड वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे चारचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेने समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि वाहनचालकांच्या बेशिस्त वर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरसोबत कॅबिनमध्ये 7- 8 जण बसले होते. यापैकी काही प्रवासी आणि क्लिनर ड्रायव्हरचा रिल शूट करत होते. ड्रायव्हर गाडी चालवत चालवत कॉलरवर करुन नाचत होता. त्याचे वाहन चालवण्याकडे लक्ष नव्हते. समोर टोलनाका आल्यानंतरही त्याच्या लक्षात आले नाही. टोलनाका आल्यानंतर त्याने अचानक गाडी वळवली आणि बस उलटली.
जळगावमध्ये भीषण अपघात!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या दिपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र समोरील महामार्गावर दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली असून या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून याच ठिकाणी सतत अपघात होत असल्याने महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world