संजय तिवारी, प्रतिनिधी
cause of Buldhana hair loss : बुलढाण्यातील अनेक गावांमधील नागरिक अचानकपणे उद्भवलेल्या केसगळतीमुळे त्रस्त झाले होते. त्यावर उपाययोजना करण्यात आली असले तरी कारण समोर आलं नव्हतं. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान बुलढाण्यातील केसगळतीचं कारण समोर आलं आहे. ज्येष्ठ संशोधक, पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर (Research by Dr. himmatrao bawaskar) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. बुलढाण्यातील बाधित पट्ट्यातील शेतजमिनीमध्ये सेलेनियम धातूचं प्रमाण आश्चर्यकारकरित्या वाढलं असताना त्यात झिंकमध्ये घट झाल्याने केसगळती होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पद्मश्री प्राप्त संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी संशोधनाअंती हा निष्कर्ष काढला आहे.
सेलेनियम हे खनिज मानवी शरीरासाठी आवश्यक असतो. मात्र हे खनिज प्रमाणात असेल तर मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरतं. जर या खनिजाचं प्रमाण जास्त झाल्यास उलट्या होणे, केस गळती, नखांचे रंग फिके पडणे आदी लक्षणं दिसून येतात. याशिवाय हे खनिज प्रमाणाबाहेर झाल्यास मज्जा संस्था, श्वसन, हृदय आणि किडनीचे विकार संभवतात. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कितीतरी गावांमध्ये लोकांच्या डोक्यावरील केस गळण्यामागे हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
काय आहे सेलेनियम?
सेलेनियम हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज घटक आहे. याची शरीराला फक्त कमी प्रमाणात आवश्यकता आहे. सेलेनियममुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, जळजळ कमी करते आणि काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मासे, शेलफिश, धान्य, लाल मांस, अंड, चिकन, लिव्हर आणि लसून आदी पदार्थांमधून सेलेनियम मिळतं.
ICMR सह कितीतरी शासकीय पथके आणि एजेन्सिज द्वारे या पंधरा गावांना भेटी देण्यात आल्या आणि विविध नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये केसांचे, रक्ताचे, त्वचेचे, मातीच्या नमुन्याचा समावेश आहे. गावकरी काय खातात किंवा काय खातात ते अन्न-धान्य, रेशनमधील धान्य, झाडांचे नमुने घेण्यात आले. मात्र, अद्याप कोणताही अहवाल किंवा निष्कर्ष जनतेसमोर आलेला नाही. मात्र, याच पार्श्वभूमीवर पद्मश्री पुरस्कार प्राप्त संशोधक डॉ हिंमतराव बावस्कर यांनी आपल्या पथकासह दौरा करून राख, माती, कोळसा, नदीचे, आंघोळीचे आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा केले. त्यांचा अभ्यास केला असता एक धक्कादायक निष्कर्ष काढले आहे.
त्यांचे निष्कर्ष असे..
- रेशन दुकानातील धान्यामध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त आढळले, हे महत्वाचे निरीक्षण तिथे आलेल्या एजन्सीजने नोंदविल्याचे समोर आले आहे. ते कसे घडले याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांना वाटते.
- सेलेनियम जास्त, झिंक एकदम कमी आणि माती, कोळसा तसेच राखेत फॉस्फेट जास्त अशी अत्यंत बिघडलेली रासायनिक स्थिती आढळते, असे डॉ. बावस्कर यांचे निरीक्षण आहे.
- सेलेनियम एवढ्या प्रमाणात आले कुठून याचा शोध शासकीय यंत्रणेला घ्यावा लागेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
- जमिनीतून किंवा बोअरमधून पिण्याचे पाणी न वापरता, पिण्याकरिता वेगळी सोय करावी लागेल असे त्यांचे मत आहे.
- माती अल्कलीन असल्याने फॉस्फेटचा वापर कमी करून जिप्समचा वापर वाढवावा लागेल असा उपाय त्यांनी सुचविला आहे.
नक्की वाचा - Crime News : मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य
खाद्यनिगमच्या गोदामात आलेल्या गव्हाच्या एका लॉटमधून गेलेल्या धान्यात सेलेनियमचे प्रमाण वाढले असावे असा कयास आहे. त्यामुळे रेशन व्यवस्थेवर याचे खापर फुटू शकते. अगदी गव्हाच्या पिठामध्येही सेलेनियम मोठ्या प्रमाणावर आढळून आले. धुतलेले, न धुतलेले गव्हासोबतच अगदी पिठाच्या नमुन्याची चाचणी आयसीएमआरच्या पथकाने केली आहे. परंतू याबाबत अधिकृत कोणीच बोलत नाही. दरम्यान हिंम्मतराव बावस्कर आणि आयसीएमआरचे निष्कर्ष जवळपास सारखेच असल्याचे सांगण्यात येते.