Ratan Tata Passes Away: देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. रतन टाटा यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. टाटा परिवाराने निवेदन जारी करत म्हटले की,"रतन टाटा आता व्यक्तिशः आपल्यात नसले तरी त्यांच्या स्वभावातील नम्रता, औदार्य आणि त्यांचे उद्देश यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
7 ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील ICUमध्ये रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याची माहिती समोर आली होती. यादरम्यान रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे प्रकृती ठीक असल्याचे आणि दैनंदिन वैद्यकीय तपासणीकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
(नक्की वाचा: रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी, महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राला विनंती प्रस्ताव)
कोणत्या आजारामुळे होते त्रस्त?
मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचा रक्तदाब कमी झाला होता, यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीअंतर्गत रतन टाटांवर औषधोपचार सुरू होते. पण त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अथक प्रयत्न केल्यानंतरही वाढत्या वयोमानामुळे डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवण्यात अपयश आले. कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे रतन टाटा हायपोटेंशन आजारामुळे पीडित होते. ज्यामुळे त्यांच्या शरीराचे अवयव निकामी होऊ लागले. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. टाटा यांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्याही निर्माण झाली होती, असेही म्हटले जात आहे.
(नक्की वाचा: इंग्लंडच्या राणीने मेजवाणीला बोलवले, पण 'त्या'एका कारणासाठी रतन टाटांनी जाणे टाळले)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. "रतन टाटाजी एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळु आत्मा आणि असामान्य व्यक्ती होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थीर नेतृत्व प्रदान केले. माझे मन श्री रतन टाटाजी यांच्यासोबत झालेल्या अगणित संभाषणांनी व्यापलेले आहे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझी त्यांच्यासोबत अनेकदा भेट व्हायची. आम्ही विविध मुद्यांवर विचार विनिमय करायचो. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. जेव्हा मी दिल्लीत आलो तेव्हाही संवाद सुरू राहिला. त्यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. या दु:खाच्या वेळेस त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती", असे पोस्ट 'X'वर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा: 'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट)
साध्या राहणीमानासाठी कायम राहतील आठवणीमध्ये
रतन टाटा हे जगातील सर्वाधिक प्रभावशाली उद्योगपतीपैंकी एक होते, तरी कधीही अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचे नाव दिसले नाही. त्यांच्या मालकीच्या 30हून अधिक कंपन्यांचा व्यापार, सहा खंडांमध्ये 100हून अधिक देशांमध्ये विस्तारला आहे. इतकी समृद्धी असतानाही त्यांनी कायम साधी राहणीमानच पत्करले.
रतन टाटा यांनी विनम्रता आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. त्यांनी 1962मध्ये कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्कमधून आर्किटेक्चरमध्ये बीएस पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर ते कौटुंबिक कंपनीमध्ये रुजू झाले. त्यांनी सुरुवातीला एका कंपनीत काम केले आणि टाटा समूहाच्या अनेक व्यवसायांचा अनुभव घेतला, त्यानंतर 1971मध्ये त्यांची 'नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी'चे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.