Mumbai Cable Car : केबल कारमुळे मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सुटेल? सव्वा लाख कोटींचा प्रकल्प नेमका काय आहे?

Maharashtra Transport : महाराष्ट्र सरकारने रोप-वे किंवा केबल कारचा प्रकल्प राबविण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.  

जाहिरात
Read Time: 5 mins

मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या (Mumbai Traffic) हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढतं स्थलांतर, वाहनांची वाढती संख्या त्यात भौगोलिक मर्यादा असल्यामुळे मुंबईतील रस्ते कमी पडत असल्याचं चित्र आहे. मेट्रो सुरू झाल्याने वाहतुकीचा प्रश्न काही अंशी कमी होईल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने (Mumbai Rope way) रोप-वे किंवा केबल कारचा (Mumbai Cable Car) प्रकल्प राबविण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईच्या वाहतूक कोंडीतून प्रवासांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडून रोपवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे 'पर्वतमाला परियोजने'अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) किंवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप-वे विकसित करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Advertisement

वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी केबल कार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई महानगर क्षेत्रातील वाढतं नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, त्या तुलनेत अपुरी रस्ते आणि रेल्वे सेवा, वाढते प्रदूषण या कारणांमुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी झालेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान, सागरी किनारा खाडीचा प्रदेश, एलिफंटासारखी प्राचीन लेणी, माथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी रोप-वेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Government Scheme: सर्व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार; CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय!

मुंबईतील पाच मार्गांवर रोपवे उभारण्यात येणार

1. कांदिवली ते गोराई 6 किमी प्रवासाला सध्या 1 तास लागतो
रोप वेनं हे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार आहे 

2. मुलुंड ते नॅशनल पार्क या 12 किलोमीटरच्या प्रवासाला दीड तास लागतो
रोप वेनं या अंतरासाठी अर्धा तास लागणार आहे.

3.भाईंदर ते एस्सेलवर्ल्ड हे 9 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पाऊण तास लागतो
रोप वेमुळे हे अंतर 15 मिनिटांत पार करणं शक्य आहे. 

4. एक्सर मेट्रो ते गोराई 5 किलोमीटरच्या प्रवासाला तासभर लागतो
रोपवेने हे अंतर 10 मिनिटांत पार केलं जाईल. 

5. घाटकोपर ते घणसोली या 5 किलोमीटरच्या प्रवासाला एक तास लागतो
हे अंतर रोपवेमुळे 10 मिनिटांत पार करता येईल. 

रोप वेची महत्त्वाची वैशिष्ट्ये...
- महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रवासासाठी रोप-वेचा वापर
- एका तासात 6 हजार जण प्रवास करू शकतात
- पाच वर्षात 200 प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस
- सव्वा लाख कोटींहून अधिक खर्च अपेक्षित
- प्रवासांच्या वेळीची बचत

नक्की वाचा - 8th Pay Commission : मोदी सरकारचं नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, पगारामध्ये होणार वाढ

केबल कार किती फायदेशीर? नागरिकांना काय वाटतं?
मुंबईतील वाहतुकीच्या समस्येने टोक गाठलं आहे. काही किलोमीटरसाठी तासन् तास प्रवास करावा लागतो. मुंबईत मेट्रो आली तरी वाहतुकीच्या समस्येवर फारसा परिणाम झालेला नाही. मुंबईला वाढण्यासाठी फारशी जागा नाही. गाड्यांसाठी रस्ते कमी पडतायेत. त्यामुळे काहीतरी वेगळा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी रोप वे किंवा केबर कार फायदेशीर ठरते. मात्र इथं रस्त्यावरुन हजारो लोक प्रवास करीत असतात. अशा ठिकाणी रोपवे कार फायदेशीर ठरेल असं वाटत नसल्याचं एका नोकरदार तरुणाने सांगितलं. 

त्यातही एका प्रवाशाने रोपवेच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केला. लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. तेथे धक्काबुक्की आणि अपघाताच्या घटना घडत असतात. रोप वेमध्ये गर्दी वाढली तर दुर्घटना होऊ शकते, अशी भीती एका नागरिकाने व्यक्त केली.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रोप वेचं तिकीट सर्वसामान्यांना परवडणारं असावं. रोप वेने प्रवाशांचा वेळ वाचेल. मात्र ठिकठिकाणी रोपवे तयार करायला हवेत. जास्त रोप वे म्हणजे त्यासाठी निधीही जास्त लागेल. परिणामी तिकीटदर जास्त असेल. त्यामुळे आधी मुंबईतील मेट्रो सुरळीत व्हायला हवी त्यानंतर केबल कारचा विचार केला जाऊ शकतो. रोप वे सुरळीत झालं तर रस्ते प्रवास कमी होईल, परिणामी रस्ते वाहतूक कमी होईल.

सद्यपरिस्थितीत बससाठी किती तरी वेळ पाहावी लागते. बसमध्ये बसल्यानंतरही वाहतूक कोंडी हा विषय असतो. त्यामुळे घरी वेळ घालवता येत नाही, अशी खंत मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशाने व्यक्त केली आहे. 

मुंबईतील कार केबल रेल्वे स्टेशनला जोडायला हव्यात - अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ
रोप-वे ही संकल्पना चांगली आहे. डोंगर किंवा उंचावरील ठिकाणी रोप-वे उपयोगाचे आहेत. कोलंबियामधील मेडेल इनमधील रोप-वे सुविधांनीयुक्त आहे. येथे दर दोन मिनिटात रोप-वे आहे. विशेष म्हणजे या रोप-वेचा नियमित वापर होतो. हा रोप-वे रेल्वे स्टेशनशी जोडला गेला असल्याने याचा उपयोग अधिक आहे. मात्र मुंबईमधील रोप-वे रेल्वे स्टेशनशी जोडल्या गेलेल्या नाहीत असं दिसतंय. त्यामुळे रोप-वेचा सर्वसामान्यांना किती फायदा होईल याबाबत साशंकता आहे. सद्यस्थितीत केवळ प्रकल्प करण्यावर लक्ष दिलं जात आहे. मात्र त्या प्रकल्पातून किती फायदा होईल, त्याची गरज काय याचा सांगोपांग विचार करणं आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटींचा खर्च केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या केबल कारमधून दररोज किमान 15 हजारांहून जास्त लोक प्रवास करीत का याबाबत शंका आहे. सध्या प्रकल्प राबविण्यामागे पैसे खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. जितका मोठा प्रकल्प तेवढं जास्त पैसे बळकावता येतात. सध्या प्रकल्प राबविण्यामागे पैसे खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. जितका मोठा प्रकल्प तेवढं जास्त पैसे बळकावता येतात.

नक्की वाचा - Sonamarg Tunnel: PM मोदींच्या हस्ते झेड मोऱ्ह बोगद्याचे लोकार्पण, दहशतवाद्यांसह पाक-चीननंही घेतला धसका

महाराष्ट्रात कुठे कुठे रोप-वे प्रकल्प? आणि त्याचे दर किती?
सध्या महाराष्ट्रात काही पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवर रोप-वे तयार करण्यात आले आहेत. त्यात नाशिकची सप्तश्रृंगी येथे केबल ट्रेन आहे. यासाठी ये-जा करण्यासाठी प्रत्येकी 120 रुपये आकारले जातात. त्याशिवाय रायगड आणि सापुतारा येथेही रोप-वे उपलब्ध आहेत. 

देशभरातील प्रसिद्ध रोप-वे प्रकल्प 
महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्येही पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवर रोप-वेचा वापर केला जात असल्याचं दिसतं. 

  1. गंगटोक रोप-वे (सिक्कमी)
  2. गन हिल केबल कार, मसुरी (उत्तराखंड)
  3. सोलांग वॅली रोप-वे, मनाली (हिमाचल प्रदेश)
  4. महाकाली रोप-वे (गुजरात)
  5. ऑली केबल कार, ऑली (उत्तराखंड)
  6. राजगीर रोप-वे, राजगीर (बिहार)
  7. रंजित वॅली केबल कार, दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)
  8. उडन खटोला, मालमपुझा (केरळ)
  9. स्काय व्यू गंडोला, पटनीटॉप (जम्मू आणि काश्मीर)
  10. ग्लेनमोर्गन रोप-वे, उटी (तमिळनाडू)