Mahaparinirvan Din 2024: भारतीय संविधनाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला. महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. या दिवशी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला जातो आणि त्यांना वंदन केले जाते. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध प्रकारे अभिवादन केले जाते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोल्यात कॅन्डल मार्च रॅली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी अकोल्यात भीम अनुयायांनी भव्य कॅन्डल मार्च काढला. अकोला शहरातील विविध भागातून टॉवर चौक, जुने बस स्टँड, धिग्रा चौक, पोस्ट ऑफिस अशोक वाटिकापर्यंत कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. दरम्यान भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी आणि शेकडो भीम अनुयायी यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 5 डिसेंबर रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी अभिवादन करण्यात आले.
(नक्की वाचा: Mahaparinirvan Diwas: स्वतंत्र भारताच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान अढळ का आहे?)
समता सैनिक दलाकडून अशोक चक्र पुष्प देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आणि बुद्ध वंदना घेऊन अभिवादन केले.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांची स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.
(नक्की वाचा: जातिभेद नष्ट करण्यासाठी संविधानातच व्यवस्था करायला हवी, नेमाडेंचं परखड मत)
मेणबत्ती स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते, त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी स्वतःच्या सुखी जीवनाचा त्याग करून इथल्या शोषितांचे, पीडितांचे, महिलांचे तसेच कित्येक भारतीयांचे जीवन प्रकाशमय केले. हाच संदेश या कॅन्डल मार्च रॅलीतून शेकडो भीम अनुयायांनी देण्याचा प्रयत्न केला.