
मुंबई: महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कांद्याच्या किंमतींमध्ये स्थैर्य आणण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा थेट किरकोळ विक्रीला सुरुवात केली आहे. केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते गुरुवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सरकारच्या बफर स्टॉकमधील कांदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या नियंत्रित व लक्ष्यित वितरण प्रक्रियेअंतर्गत ही विक्री होणार आहे.
कांद्याची किंमत
किरकोळ विक्रीदरम्यान ग्राहकांना कांदा २४ प्रति किलो या दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्यात आली आहे. नॅफेड (NAFED), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन (NCCF) आणि केंद्रीय भांडार (Kendriya Bhandar) यांच्या आउटलेट्स व मोबाईल व्हॅन्समार्फत कांदा विक्री होईल. नॅफेड व एनसीसीएफच्या वितरण भागीदारांमार्फत देखील कांदा उपलब्ध करून दिला जाईल.
किती दिवस विक्री सुरू राहणार?
सरकारने अद्याप नेमका कालावधी जाहीर केलेला नाही. मात्र महागाई नियंत्रणात राहेपर्यंत आणि बाजारातील दर स्थिर होईपर्यंत ही विक्री सुरू ठेवली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत. बफर स्टॉकमधील मोठ्या प्रमाणातील कांदा हळूहळू बाजारात सोडला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाखो टन कांदा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. मागणी आणि दर यांचा अभ्यास करून, दररोज व साप्ताहिक स्तरावर कांद्याचे प्रमाण बाजारात सोडले जाईल. केंद्र सरकारच्या मते, थेट ग्राहकांपर्यंत स्वस्त कांदा पोहोचवल्यामुळे बाजारातील दर नियंत्रणात राहतील व अलीकडील महिन्यांमध्ये अन्न महागाई वाढीवर ब्रेक लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world