मंगेश जोशी, जळगाव
जळगाव शहरात तरुणींचा सहभाग असलेल्या चादर गँगने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या गँगने शाळांना लक्ष करत एकाच रात्री चार शाळांमधून दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. सावखेडा शिवारातील चार शाळांमध्ये या गँगने चोरी करून विद्यार्थ्यांची फी व शिष्यवृत्तीच्या परीक्षेची रक्कम लांबवली असून याप्रकरणी या गँग विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल, गुरुकुल किड्स व शानबाग विद्यालय या शाळांना एकाच रात्री चादर गँगने चोरी केली. विशेष म्हणजे यातील काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असतानाही शाळेत प्रवेश करून शाळेतील रोख रक्कम या चादर गँगने लंपास केली आहे.
गँगमधील तरुणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळा व परिसरात पाहणी करून शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुकुल किड्स या शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही टोळी कैद झाली असून तोंडाला स्कार्फ बांधून अंगावर चादर ओढून 4 जणांची टोळी चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासणी केली असता या चार जणांच्या टोळीमध्ये तीन तरुणी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- UP News: बायकोने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत)
तरुणींनाही गुन्हेगारीची कीड?
राज्यात काही शहरांमध्ये कोयता गँग, स्प्रे गँग, चड्डी गँग अशा गँगमार्फत दहशत निर्माण करून दरोडा, चोऱ्या, लुटमार करण्यासारख्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता जळगावमध्ये चादर गँगचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या गँगमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गँगमध्ये तरुणींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तरुणींनाही गुन्हेगारीची कीड लागल्याचे समोर येत आहे.
चड्डी-बनियन गँगनंतर चादर गँगच्या धुमाकूळ
जळगाव शहरात ऑगस्ट महिन्यामध्ये रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगने धुमाकूळ घालत होता. त्यानंतर आता या चादर गँगने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या गँगचा पोलिसांकडून कसून शोध घेतल्या जात आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
चादर गँगचे शाळांना लक्ष?
सावखेडा शिवारात शहरापासून लांब असल्याने या चादर गँगने या परिसरातील शाळांना लक्ष केले आहे. रात्रीच्या सुमारात शाळांमध्ये प्रवेश करणे व चोरी करणे शहरी भागापेक्षा सोयीस्कर असल्याने या गँगकडून शाळांना लक्ष केल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. तर काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असतानाही चादर गँगने शाळांमध्ये प्रवेश करत चोरी केल्याने एकच खळबा उडाली आहे.