Jalgaon Election 2025: भाजप आमदाराच्या पत्नीचे मतमोजणीआधीच झळकले विजयाचे बॅनर; मात्र निकाल काय लागला?

Jalgaon News: निकालापूर्वी काही तास आधीच शहरात प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते. मतमोजणी सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्समुळे शहरात मोठी चर्चा आणि राजकीय वादंग निर्माण झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवार पद्मजा देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे चाळीसगाव नगरपरिषदेवर भाजपने सलग दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकवला असून, एकहाती सत्ता काबीज केली आहे.

बॅनरबाजी ठरली सार्थ

निकालापूर्वी काही तास आधीच शहरात प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले होते. मतमोजणी सुरू होण्याआधीच कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनर्समुळे शहरात मोठी चर्चा आणि राजकीय वादंग निर्माण झाले होते. अनेकांनी याला कार्यकर्त्यांचा अतिउत्साह म्हटले होते, मात्र अधिकृत निकालाने हे सिद्ध केले की, तो केवळ उत्साह नसून विजयाचा ठाम आत्मविश्वास होता.

(नक्की वाचा-  Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो')

दोन बलाढ्य घराण्यांची लढत

ही निवडणूक खऱ्या अर्थाने दोन दिग्गज राजकीय घराण्यांमधील वर्चस्वाची लढाई होती. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. हा निकाल त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दिलेली मोहोर मानली जात आहे. तर पद्मजा देशमुख या दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी असून, देशमुख कुटुंबाचे राजकीय पुनरागमन करण्यासाठी राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

भाजपचे प्रचंड बहुमत

केवळ नगराध्यक्ष पदच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली. भाजपने नगरपरिषदेत प्रचंड बहुमत मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. "निकालापूर्वीच आम्ही विजयाची तयारी केली होती, कारण चाळीसगावच्या जनतेने विकासाला साथ दिली आहे," अशी प्रतिक्रिया विजयी रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दिली.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Election 2025: पुण्यात 'दादां'चीच हवा! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी झेप)

जिल्ह्यात चर्चेचा विषय

निकालापूर्वी विजयाचे बॅनर्स लावणे ही बाब संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. आता प्रतिभा चव्हाण यांचा विजय निश्चित झाल्याने, "कार्यकर्त्यांची खात्रीच खरी ठरली" अशी चर्चा शहरात रंगली आहे.

Topics mentioned in this article