जाहिरात

Chandrapur Wedding: लग्नाचा खर्च टाळून केलं असं काम.. 'या' आदर्श विवाह सोहळ्याची होतेय जिल्ह्यात चर्चा!

Chandrapur Ideal Wedding: सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला.

Chandrapur Wedding: लग्नाचा खर्च टाळून केलं असं काम..  'या' आदर्श विवाह सोहळ्याची होतेय जिल्ह्यात चर्चा!

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: लग्नसोहळा म्हणलं की, खर्च, झगमगाट अन् थाटमाट आलाच. लाखो रुपयांचा चुराडा करुन दणक्यात लग्नाचा बार उडवून द्यायचा अशी पद्धतच जणू अलिकडच्या काळात पाहायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या थाटामाटात लग्नसोहळे होत असतानाच चंद्रपूरमधील एका जोडप्याने मात्र लग्नाचा खर्च टाळून समाजासाठी असं काम केलं की ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा..

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले. नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला. सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला.

नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. लग्न करताना त्यांची लग्न सत्यशोधक पद्धतीने करण्याची एकच अट होती.  मुलगी अंजलीच्या वडिलांकडे हा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. लग्नात कोणताही अधिकचा खर्च करायचा नाही. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे.  श्रीकांतने सर्व नातेवाईकांना फळझाडे भेटवस्तू स्वरूपात देण्यास सांगितले. नातेवाईक आणि मित्रांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल 90 पेक्षा जास्त फळझाडे भेट दिली, त्याची लागवड करून आता मोठी फळबाग तयार होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: