जाहिरात
This Article is From Apr 14, 2024

चंद्रपूरात 125 जणांना महाप्रसादातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू

महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु माजरी येथील रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.

चंद्रपूरात 125 जणांना महाप्रसादातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू
चंद्रपूर:

प्रतिनिधी, सादिक थैम

वरोरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी येथे महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास 125 लोकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यापैकी एकाचा मृत्यू झाला झाला असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात विषबाधा झालेल्यात 6 पुरुष, 30 महिला व 24 लहान मुलांवर उपचार सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीनिमित्त माजरी येथील कालीमाता मंदिर येथे काल 13 एप्रिल रोज शनिवारला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी माजरी येथील नागरिक सहभागी झाले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु माजरी येथील रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. माजरी येथील वेकोलीच्या दवाखान्यात सलाईनचाही साठा पुरेसा नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती काही रुग्णांनी दिली.

विषबाधा झालेले भाविक रात्री दीडच्या सुमारास वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वखर्चाने पोहोचले. या रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था माजरी येथील वेकोली प्रशासनाने केली नसल्याची माहिती आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात तातडीने सर्वांवर उपचार सुरू झाले.  उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 69 विषबाधाग्रस्तांपैकी सहा जणांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यापैकी गुरुफेन यादव हा 80 वर्षीय रुग्ण मृत पावल्याचे कळते. यास इतरही आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Latest and Breaking News on NDTV


चंद्रपूर येथे हलविण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आर्यन राजपुता 5 वर्ष, अभिषेक वर्मा 5 वर्ष, आशय राम 3 वर्ष, सोमय्या कुमार दीड वर्ष, देवांश राम अडीच वर्ष व गुरु फेन यादव 80 वर्ष या जणांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्यांपैकी माजरी येथे प्राथमिक उपचार केंद्रात 10 जणं, वेकोलीच्या रुग्णालयात 25 ते 30 जणं दाखल असून काहीजण चंद्रपूर व वणी येथे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रुबीना शेख, प्रणाली अलोणी, शीतल राठोड, अश्विनी बागडे, राखी पचारे, प्रदीप गायकवाड, प्रशांत सातकर, रोहिणी आत्राम, शरद घोटकर, माधुरी बावणे, विजू उईके, सागर कपाटे, सतीश येडे, समीर, अमोल भोंग यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. सध्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टर आकाश चिवंडे यांनी दिली. महाप्रसादामध्ये वरण-भात, भाजी, पोळी व बुंदी या पदार्थांचा समावेश होता. यातील  बुंदीतून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com