Chandrapur News: एका अफवेने नागरिकांची उडाली झोप; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा

Gadchiroli News: पुढील पाच दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा अफवेमुळे चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची तोबा गर्दी झाली आहे. प्रशासनाने अद्याप अधिकृत टंचाई जाहीर केलेली नसली तरी, भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या फुल्ल करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपुरात सध्या इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-अमेरिका) संघर्षामुळे इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत लोकांमध्ये साशंकता आहे, ज्याचा फायदा अफवा पसरवणारे घेत आहेत.

 "पाच दिवस पेट्रोल मिळणार नाही..." ही एक ओळ चंद्रपूरकरांसाठी आज चिंतेचा विषय ठरली. दुपारपासून सोशल मीडिया आणि तोंडी चर्चेतून ही अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. परिणामी, शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर जत्रेसारखे स्वरूप आले असून, परिस्थिती हाताळताना पंप चालकांची नाकी नऊ येत आहेत.

अफवेने पेट्रोल पंपांवर रांगा

चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर इतकी गर्दी आहे की, अनेक वाहनधारकांनी शहराबाहेरील 10-15 किमी अंतरावर असलेल्या पंपांकडे धाव घेतली आहे. एरवी 100-200 रुपयांचे पेट्रोल भरणारे दुचाकीस्वार आज 500 ते 700 रुपयांचे (पूर्ण टाकी) पेट्रोल भरताना दिसत आहेत. चारचाकी वाहनधारकांचीही हीच स्थिती आहे. पेट्रोल पंपांच्या बाहेर लागलेल्या रांगांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली आहे.

Advertisement

जागतिक संघर्षाचे सावट

सध्या इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, भारतातही एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर "आता पेट्रोलही संपणार" अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, देशात पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे.

प्रशासनाचा खुलासा आवश्यक

नागरिकांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अधिकृत पत्रक काढून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे. साठेबाजी रोखण्यासाठी आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे समजते.
 

Topics mentioned in this article