अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Tiger-Human Conflict : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या कमालीची वाढल्याने त्यांना जंगल कमी पडू लागलं आहे. त्यामुळे वाघ आता गावाकडे वळू लागले आहेत. जंगलालगत असलेल्या गावांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. लोकांना शेती आणि सरपण आणण्यासाठी जंगलात जाणे अवघड झाले आहे. अशावेळी वाघांकडून गावकऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात अकरा लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. जिल्ह्यात सुमारे अडीचशेहून अधिक वाघ आहेत. यातील पन्नास वाघ ताडोबा प्रकल्पात, तर इतर आरक्षित जंगलात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या काकुंकडून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न
अलीकडे तर ताडोबातील वाघही बाहेर पडू लागले आहेत. आपल्या क्षेत्रावर प्रभाव ठेवण्यासाठी शक्तिशाली वाघांनी कमजोर वाघांना बाहेर काढलं. त्यामुळे संरक्षित जंगल आणि गावाजवळच्या सुरक्षित ठिकाणी वाघ आसरा घेऊ लागलेत. यातूनच मानव वाघ संघर्ष वाढू लागलाय. यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाही. लोकांचं प्रबोधन करूनही ते जंगलात प्रवेश करीतच आहेत. दिलेल्या सूचनांचे बऱ्याचदा पालन होत नसल्याने हल्ले वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप दिसून येतो. आता राजकीयदृष्ट्याही प्रश्न उपस्थित केला जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले, तर अभ्यासकांनी यावर सरकारी प्रयत्नांची गरज व्यक्त केली.
नक्की वाचा - Chandrapur News : नातवाला संकटात पाहून आजोबांनी मारली उडी, ऐन दिवाळीत चंद्रपुरातील मन हेलावणारी घटना
सतत घडणाऱ्या या घटनांनी जंगलात असलेली गावे दहशतीत आली आहेत. दुसरीकडे लोकांमध्ये वन विभागाबद्दल संतापही दिसू लागला आहे. वन्यजीवांचे संरक्षण व्हायलाच हवे, हा वनविभागाचा आग्रह. माणसांच्या संरक्षणाचे काय? हा प्रश्नही तितकाच गंभीर आहे.
वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या ( 4 सप्टेंबरपासून आजतागायत)
१) भूमिका पेंदाम, कळमगाव 
२) पांडुरंग चचाने, सावली
३) अन्नपूर्णा बिलोरे, सोमनाथ 
४) अमोल नन्नावरे 
५) प्रमोद राऊत, ब्रम्हपुरी
६) विद्या मसराम, चिमूर
७) प्रशील मानकर 
८) भाऊजी पाल, धाबा 
९) वासुदेव वटे, नागभीड 
१०) नीळकंठ भुरे, चिमूर
११) अल्का पेंदोर, धाबा