संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Chemical coating process of the Vitthal idol in Pandharpur : गेल्या 28 युगापासून पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे. याच मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने मंदिरात रासायनिक लेपन प्रक्रिया होते. मात्र विठ्ठल मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला वारकरी सांप्रदायाने विरोध दर्शवला आहे. वारंवार होणारे रासायनिक लेपण मूर्ती संवर्धनासाठी घातक असल्याची भूमिका वारकरी सांप्रदायाने घेतली आहे. त्यामुळे गेल्या 28 युगापासून अव्यहातपणे भक्तांना दर्शन देणारी सावळी विठूमाऊली सध्या वज्रलेपामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
पाचव्यांदा मूर्तीवर रासायनिक लेपण प्रक्रियेचा निर्णय
पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू मूर्ती समजली जाते. वालुकामय असणाऱ्या मूर्तीवर सर्वात पहिल्यांदा 19 फेब्रुवारी 1988 साली रासायनिक लेपण प्रक्रिया झाली. यानंतर पुढे तीन वेळा अशी प्रक्रिया मूर्तीवर झाली आहे. तरीदेखील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची आणि काही भागांची झीज होते. त्यामुळे आता पाचव्यांदा मूर्तीवर रासायनिक लेपण प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने मंदिर समितीला तशी परवानगी दिली. त्यामुळे मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया लवकरात होणार आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीवर आजपर्यंत चार वेळा रासायनिक लेपण प्रक्रिया झाली. कोरोनाचा लॉकडाऊन मध्ये 24 जुलै 2020 साली शेवटची रासायनिक प्रक्रिया झाली होती. या रासायनिक प्रक्रियेतील त्रुटींमुळे चौथ्या रासायनिक प्रक्रियेची दुरुस्ती 23 जून 2023 साली करण्यात आली. आजपर्यंत कधी कधी आणि किती वेळा रासायनिक प्रक्रिया लेपन झाले. पाहूया...
विठ्ठलाच्या मूर्तीवर आजपर्यंत झालेली रासायनिक प्रक्रिया लेपन -
1) पहिली प्रक्रिया - 19 फेब्रुवारी 1988
2) दुसरी प्रक्रिया - 24 मार्च 2005
3) तिसरी प्रक्रिया - 20 मार्च 2012
4) चौथी प्रक्रिया - 24 जुलै 2020
चौथ्या प्रक्रियेची दुरुस्ती - 23 जून 2023
पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार प्रति पाच वर्षांनी विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया लेपन करणे गरजेचे आहे. मात्र आजपर्यंत झालेल्या चार रासायनिक लेपन प्रक्रियेत खूप अंतर असलेले दिसून आले. मात्र चार रासायनिक प्रक्रिया लेपन होऊन देखील मूर्तीमध्ये सकारात्मक भाव दिसत नाही. उलट वारंवार होणाऱ्या प्रक्रियेमुळे मूर्ती संवर्धनाच्या दृष्टीने घातक परिणाम होतात. अशी शंका वारकरी संप्रदायाने उपस्थित करत रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे.
पौराणिक कथा आख्यायिकेनुसार 28 युगापासून विठ्ठल विटेवर उभा असल्याचे बोलले जाते. वास्तवात पंढरपूरची विठ्ठलमूर्ती आणि मंदिराचे अस्तित्व अकराव्या शतकातले सापडते. त्यामुळे शेकडो वर्ष जुन्या मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रक्रिया केली जात आहे. तर ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. मात्र वारकरी संप्रदायाच्या मतानुसार वारंवार रासायनिक प्रक्रिया का होते? हा देखील तितकाच अभ्यासाचा विषय. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेप रासायनिक प्रक्रियेबाबत गेल्या 28 युगांची कारणमीमांसा पुरातत्त्व विभागतज्ज्ञ व वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ अभ्यासाकांनी पुढे आणणे गरजेचे आहे.