Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. जेवताना भाजीत केस का निघाला? या क्षुल्लक कारणावरून एका निर्दयी पतीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला रक्तंबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. रात्रभर पत्नीने शरीरावरील जखमा आणि मानसिक वेदना सहन केल्या.
मात्र, सासरच्यांकडून आणि पतीकडून होणारा हा छळ असह्य झाल्याने शेवटी मंगळवारी सकाळी तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. अवघ्या २५ व्या वर्षी एका तरुण विवाहितेने गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजय बनकर असे निर्दयी पतीचे नाव असून, ईश्वरी बनकर असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितचं नाव आहे.
CM Fellowship: मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी! तब्बल 61,500 रुपये मानधन, कसा कराल अर्ज?
विवाहितेची आत्महत्या
ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न २०२० मध्ये मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. सासरच्यांना सोने-नाणे, २ लाख रुपये हुंडा आणि सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही पती अजय हा वारंवार माहेरहून पैशांची मागणी करण्यासाठी तिला मारहाण करत असे. दारूच्या नशेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.
विशेष म्हणजे अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत असतानाही त्याचे वागणे कोणत्याही हिंसक गुन्हेगारापेक्षा कमी नव्हते. ईश्वरीच्या आत्महत्यानंतर कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात ठिय्या धरला होता. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. छावणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पती अजय बनकर याच्यासह सासरच्या सात जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल
दुसरीकडे, केज तालुक्यातील चिंचोली माळी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनुजा मावकर असे या मुलीचे नाव असून तिने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपवले.
गावातीलच एका तरुणाकडून वारंवार होत असलेल्या छळामुळे ती मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.