CM Fellowship 2026: राज्यातील कल्पक आणि उच्चशिक्षित तरुणांना प्रशासनाचा थेट अनुभव देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री फेलोशिप २०२६' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे तरुणांना मंत्रालयातील धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी
राज्यातील तरुणांसाठी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026' कार्यक्रमाची घोषणा केली असून यामधून निवड झालेल्या तरुणांना मंत्रालयात थेट काम करण्याची संधी मिळणार आहे या फेलोशिपचा मुख्य उद्देश सरकारी यंत्रणेत तरुणांच्या ऊर्जेचा आणि आधुनिक विचारांचा वापर करणे हा आहे.
एकूण ६० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, प्रशासकीय पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण ठेवण्यात आले असून, यामुळे स्त्रीशक्तीलाही प्रशासनात महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.
काय आहे पात्रता? पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना केवळ कामाचा अनुभवच मिळणार नाही, तर त्यांना आयआयटी मुंबईच्या सहकार्याने 'सार्वजनिक धोरण' या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण करता येणार आहे. ६१,५०० रुपये प्रतिमहिना इतके आकर्षक मानधन आणि राजपत्रित गट-अ अधिकाऱ्याचा दर्जा यामुळे ही फेलोशिप राज्यातील तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. एका वर्षाच्या या कालावधीत तरुण भविष्यातील सक्षम नेतृत्व म्हणून उदयाला येतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world