
एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी मागणी केली आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले असून 31 मेपर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे संभाजीराजेंचे पत्र?
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे.
त्यामुळे राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, असे संभाजीराजेंनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world