Chhatrapati Shivaji Maharaj Agra Escape Mystery: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार भारतीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक अध्याय आहे. मात्र, महाराज पेटाऱ्यातून निसटले ही रुढ झालेली कथा पूर्णपणे सत्य नाही, असा दावा प्रसिद्ध कादंबरीकार आणि इतिहासकार विश्वास पाटील यांनी केला आहे. साताऱ्यात सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पाटील यांनी त्यांच्या ‘अस्मान भरारी' या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक ऐतिहासिक रहस्यांवरून पडदा उचलला आहे.
पेटाऱ्याची गोष्ट आणि औरंगजेबाची शंका
विश्वास पाटील यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून निसटले नाहीत. औरंगजेबाला शंका आली होती, म्हणूनच त्याने पेटाऱ्यातून प्राण्यांची वाहतूक करून पाहिली होती. त्यावेळी जहांगीरच्या काळातील चिडीया खाना नावाच्या संग्रहालयातून दोन हरणे पेटाऱ्यात भरून पाठवण्यात आली होती.
महाराजांच्या वजनाचे मोठे हरीण आणि संभाजी महाराजांच्या वजनाचे छोटे हरीण असे हे नियोजन होते. प्रवासाअंती मोठे हरीण मृत अवस्थेत सापडले, तर छोटे हरीण बेशुद्ध पडले होते. औरंगजेबाचा असा तर्क होता की, शिवाजी आपल्या मुलाचा प्राण अशा प्रकारे धोक्यात घालणे शक्य नाही. त्यामुळे महाराज दुसऱ्याच मार्गाने निसटले असावेत, असे पाटील यांनी सांगितले.
(नक्की वाचा : Sindhudurg News : घरांना कुलुप,मुक्या जनावरांसह अख्खं गाव 5 दिवस रानात ! वाचा काय आहे 450 वर्षांची परंपरा )
सर्वांच्या डोळ्यादेखत कशी झाली सुटका?
छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका ही अत्यंत धाडसी आणि बुद्धिमत्तेचा नमुना होती. महालाभोवती 2 हजार सैनिकांचा कडा पहारा असताना महाराज तिथून बाहेर पडले. विश्वास पाटील यांच्या दाव्यानुसार, महाराजांनी स्वतःचा गोरा वर्ण आणि वेशांतराचा कौशल्याने वापर केला. आपण एखादे अरबी किंवा पारशी घोडेस्वार आहोत किंवा घोड्याचा खरारा करणारे सेवक आहोत असे भासवून ते सर्वांच्या डोळ्यादेखत तिथून निसटले.
औरंगजेबाचे इतिहासकारही असे मानतात की, रामसिंह यांच्या मदतीमुळे आणि फंदफितुरीमुळेच महाराज निसटू शकले. इटालियन प्रवासी मानुची यानेही रामसिंह यांनी महाराजांसाठी घोड्यांची व्यवस्था केल्याचा उल्लेख केला आहे.
( नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
कसा होता परतीचा प्रवास?
आग्र्याहून निघाल्यावर महाराज मथुरेला गेले नाहीत, असा दावा पाटील यांनी केला आहे. महाराज प्रयाग, बुंदेलखंड आणि अमरकंटक या मार्गाने गेले. या प्रवासात त्यांना एका आदिवासी राजाने मोठी मदत केली. झारखंडमधील पलामूचा राजा औरंगजेबविरोधी होता आणि महाराजांना याची आधीच माहिती होती.
पलामू (आताचे डाल्टनगंज) येथील एका मैदानाला आजही शिवाजी मैदान असे नाव आहे, जे 200 ते 300 वर्षांपासून अस्तित्वात आहे. शंभूराजे प्रवासादरम्यान आजारी पडल्याने त्यांना त्रिमल बंधूंच्या ताब्यात देऊन मथुरेला पाठवण्यात आले होते, तर महाराज वेगळ्या मार्गाने महाराष्ट्राकडे निघाले.
जिजाऊसाहेबांच्या भेटीचा तो भावनिक प्रसंग
महाराज आग्र्याहून निघाल्यानंतर सुमारे 90 दिवसांनी म्हणजे 20 नोव्हेंबरच्या सुमारास राजगडावर पोहोचले. त्यांच्यासोबत मिराजी रावजी हे महाराजांसारखेच दिसणारे सहकारी होते. ते गोसाव्याच्या वेशात राजगडावर आले आणि त्यांनी तिथे कीर्तन केले. हे कीर्तन ऐकून जिजाऊसाहेब बाहेर आल्या.
मिराजी रावजींचे कीर्तन ऐकून जिजाऊसाहेब त्यांच्या पाया पडायला जाणार होत्या, पण त्याच वेळी महाराजांनी त्यांना अडवले आणि आपली ओळख पटवून दिली. या प्रवासात परमानंद स्वामींच्या साधू आणि बैरागी नेटवर्कने महाराजांना वाटा दाखवण्याचे महत्त्वाचे काम केले होते.
जहानआरा बेगमची मदत आणि औरंगजेबाचा संताप
या ऐतिहासिक संघर्षात औरंगजेबाची बहीण जहानआरा बेगम हिनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. रामसिंहने तिची मदत घेतली होती आणि तिने महाराजांना भावाप्रमाणे मानून मदत केली होती. तिच्यामुळेच महाराजांना 60 लाखांची हुंडी मिळू शकली. दुसरीकडे, औरंगजेबाच्या दरबारात ‘कुर्निश' करण्याच्या पद्धतीवरून महाराज प्रचंड भडकले होते. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून बादशहासमोर झुकण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, अशी भूमिका महाराजांनी घेतली होती. हाच तो ट्रीगर पॉईंट होता जिथून संघर्षाला खरी सुरुवात झाली.