जाहिरात

Sindhudurg News : घरांना कुलुप,मुक्या जनावरांसह अख्खं गाव 5 दिवस रानात ! वाचा काय आहे 450 वर्षांची परंपरा

Sindhudurg News :  एक संपूर्ण गाव अचानक रिकामे होऊ लागते. घरांना कुलपे लावली जातात, गोठ्यातील गुरेढोरे सोडली जातात आणि पाहता पाहता तांडाच्या तांडा गावच्या वेशीबाहेर चालू लागतो.

Sindhudurg News : घरांना कुलुप,मुक्या जनावरांसह अख्खं गाव 5 दिवस रानात ! वाचा काय आहे 450 वर्षांची परंपरा
Sindhudurg News : ही गावपळण म्हणजे आता केवळ एक विधी न राहता तो एक मोठा उत्सव बनला आहे.
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी 

Sindhudurg News :  एक संपूर्ण गाव अचानक रिकामे होऊ लागते. घरांना कुलपे लावली जातात, गोठ्यातील गुरेढोरे सोडली जातात आणि पाहता पाहता तांडाच्या तांडा गावच्या वेशीबाहेर चालू लागतो. हे चित्र कोणत्याही संकटाचे किंवा भीतीचे नसून एका अनोख्या परंपरेचे आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली जात आहे, जिथे माणसांसोबत मुकी जनावरे आणि घरातील पक्षीही गाव सोडतात.

अनोखी परंपरा आणि गावकऱ्यांची मोठी श्रद्धा

एका विशिष्ट कालावधीसाठी आपले राहते घर सोडून रानात किंवा वेशीबाहेर वास्तव्याला जाण्याची ही प्रथा आजही कोकणात जिवंत आहे. या प्रथेला गावपळण असे म्हटले जाते. यामध्ये गावातील प्रत्येक लहान थोर व्यक्ती सहभागी होते. केवळ माणसे नाही, तर घरातील मांजर, कुत्रा आणि गोठ्यातील गाई-म्हशींनाही सोबत नेले जाते. या काळात गावात चिटपाखरूही उरत नाही. 

काय आहे गावपळणीची परंपरा?

हे अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील शिराळे या गावामध्ये. सुमारे 400 ते 450 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिराळे गावची गावपळण बुधवारपासून (31 डिसेंबर) सुरू झाली आहे. या ऐतिहासिक परंपरेसाठी सध्या संपूर्ण गावात उत्साहाचे आणि लगबगीचे वातावरण आहे. गेले अनेक पिढ्या येथील ग्रामस्थ ही प्रथा अत्यंत श्रद्धेने पाळत आहेत.

( नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
 

कुठे राहतात गावकरी?

गावपळणच्या काळात राहण्यासाठी ग्रामस्थांनी सडुरे येथील गावपत्थर परिसराची निवड केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी गावकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. राहण्यासाठी तात्पुरत्या राहुट्या उभारणे, परिसराची स्वच्छता करणे आणि गुराढोरांसाठी स्वतंत्र गोठे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

राहुट्यांमधील जमिनी शेणाने सारवून राहण्यायोग्य केल्या जात आहेत. एकदा का गाव सोडले की पुन्हा पाच दिवस गावात कोणालाही प्रवेश करता येत नाही, त्यामुळे पाच दिवस पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्याची बांधाबांध ते करतात.

शाळा आणि एसटी बसचे ठिकाणही बदलले

या गावपळणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थ गावातून बाहेर पडले तरी त्यांचे दैनंदिन व्यवहार थांबत नाहीत. या 4 ते 5 दिवसांच्या कालावधीत मुलांची प्राथमिक शाळा त्याच राहुट्यांच्या परिसरात भरते. इतकेच नाही तर गावात जाणारी एसटी बस सुद्धा या दिवसांत सडुरे येथील वस्तीवर थांबते. गावात सामसूम असली तरी या राहुट्यांच्या परिसरात मात्र एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळते. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी राहत असल्याने तिथे एकोप्याचे दर्शन घडते.

ही गावपळण म्हणजे आता केवळ एक विधी न राहता तो एक मोठा उत्सव बनला आहे. मुंबई किंवा राज्याच्या इतर भागात नोकरीनिमित्त स्थायिक झालेले शिराळेवासीय या सोहळ्यासाठी आवर्जून आपल्या गावी परतले आहेत. आपल्या मातीशी नाते जोडण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी सर्वजण एकत्र येतात. शिराळे गावची ही परंपरा संस्कृती आणि एकात्मतेचा एक अनोखा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com