दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जेएनयू, नवी दिल्ली येथे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा'ची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्रा'चे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी नव्हे, तर संपूर्ण भारताचे सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या अद्वितीय सामरिक योजनांचा आणि स्थापत्यशास्त्राचा युनेस्कोने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप' म्हणून गौरव करत 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले, हे अत्यंत गौरवाचे आहे.
RSS News: सरसंघचालक मोहन भागवतांना भेटले अनेक मुस्लीम मौलवी, कोणत्या मुद्यावर झाली सहमती?
मराठ्यांच्या जाज्वल्य लढ्यांपासून पानिपतच्या बलिदानापर्यंत, संपूर्ण भारतासाठी लढण्याची त्यांची विजिगीषू वृत्ती ही या अध्यासन केंद्रात अभ्यासली जाणार आहे. युद्धनीती, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्यनिर्मितीचा हा वारसा जेएनयूमध्ये अभ्यासाचा विषय ठरणार, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेवरही प्रकाश टाकत सांगितले की, मराठी ही भारतातील अतीप्राचीन व समृद्ध भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, ही केवळ शासकीय मान्यता नव्हे तर तो भाषेला मिळालेला राजाश्रय आहे. ‘मराठीने देशाला समृद्ध केले आहे,' असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
मराठी नाट्य, साहित्य, रंगभूमी ही देशातील सर्वोत्तम असल्याचे सांगताना त्यांनी मराठी ही केवळ भाषा नसून संपूर्ण भारतासाठी एक सांस्कृतिक वारसा असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी असेही स्पष्ट केले की, संकुचित विचार ही मराठी माणसाची प्रवृती नाही, ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 'पसायदाना'ची वैश्विक परंपरा आहे, ती इतर भारतीय भाषांच्या सन्मानातूनच जपली पाहिजे. छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या अस्मितेचा उगम आणि प्रेरणेचा अखंड झरा आहे. त्यांचं स्मरण म्हणजे आपल्या ऊर्जा स्रोताशी जोडले जाणं.
आज या जेएनयूमध्ये त्यांच्या अध्यासन केंद्राची पायाभारणी होत असताना, लवकरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय, नौसेनेच्या ध्वजावर राजमुद्रेला दिलेला सन्मान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि आज विशेष अध्यासन केंद्र, ही सर्व उदाहरणं स्पष्ट करतात की, शिवराय ही केवळ आपली ओळख नाही, तर भविष्यातील उर्जेचा पाया आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार अनिल बोंडे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार धनंजय महाडिक, तंजावरचे छत्रपती बाबाजी राजे भोसले, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्पमित्रांसाठी सरकार मोठा निर्णय घेणार, महसूल मंत्री बावनकुळे दिली माहिती