
सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सर्पमित्रांच्या विविध मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम श्रीनिवास राव यांच्यासह अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्प मित्रांच्या वतीने वेगवेगळ्या मागण्या सरकारकडे करण्यात आल्या.
नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सर्पमित्रांना दुर्घटनेत मृत्यू आल्यास 10 ते 15 लाखांपर्यंत विमा भरपाई मिळावी यासाठी वन विभागामार्फत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर्पमित्रांना काम करताना अडचण येऊ नये यासाठी त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन त्यांना ओळखपत्र मिळावे यासाठी सरकारचे प्रयत्न असतील.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत फ्रंट लाइन वर्कर म्हणून सर्पमित्रांना मान्यता मिळावी, सर्पमित्रांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टीने स्वतंत्र पोर्टल तयार करावे, आदी बाबींसंदर्भात सकारात्मक विचार करुन त्याअनुषंगाने वन विभागाला निर्देश देण्यात येतील, असे ही बावनकुळे यांनी सांगितले. सर्पमित्रांनी वन्यजीव कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world