विशाल पुजारी, कोल्हापूर
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी पहिल्या रेल्वेचा कोल्हापुरात आज शुभारंभ झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. 10.35 वाजता ही पहिली ट्रेन अयोध्येला निघाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी या रेल्वेतून प्रवास करत आहेत. लॉटरीद्वारे या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. जाणून घेऊया त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे.
(नक्की वाचा- अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा)
या योजनेकरता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2 हजार 146 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत" निवड झालेले ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेणारा कोल्हापूर हा राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरणार आहे. पालकमंत्री तथा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी या सर्वांचे अभिनंदन देखील केले.
(नक्की वाचा- अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं)
काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना?
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले 60 वर्षांवरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तीर्थयात्रा योजनेंतर्गत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जास्तीत जास्त 30,000 रुपयांचा लाभ मिळेल.