CM Relief Fund: 20 गंभीर आजारांसाठी मिळेल मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घरबसल्या करा अर्ज

Chief Minister's Assistance Fund Application Process: पेपरलेस आणि डिजिटल प्रणालीमुळे रुग्णांना मदतीसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष एक मोठा आधार ठरतो आहे. गेल्या सात महिन्यांत विशेषतः कोकण विभागात 2,738 रुग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामुळे अनेक रुग्णांना गंभीर आजारांवर उपचार घेणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या कक्षाने पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना मदतीसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. जिल्हा स्तरावर मदत कक्ष स्थापन झाल्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

संलग्न रुग्णालयांमधूनही करता येतो अर्ज

रुग्णांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत यांसारख्या योजनांचा प्रथम लाभ घ्यावा. त्यानंतरही उपचार शक्य नसल्यास, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा योग्य वापर होऊन निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो, असे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी  निधीतून 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. खालील आजारांसाठी ही मदत उपलब्ध आहेय

  1. कॉक्लियर इम्प्लांट (2 ते 6 वर्षांसाठी)
  2. हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस आणि बोन मॅरो प्रत्यारोपण
  3. हाताचे प्रत्यारोपण
  4. हिप रिप्लेसमेंट
  5. कर्करोग शस्त्रक्रिया
  6. रस्ते अपघात
  7. लहान मुलांची शस्त्रक्रिया
  8. मेंदूचे आजार
  9. हृदयरोग
  10. डायालिसिस
  11. कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन)
  12. अस्थिबंधन
  13. नवजात शिशुंचे आजार
  14. गुडघ्याचे प्रत्यारोपण
  15. भाजलेले रुग्ण
  16. विद्युत अपघातग्रस्त रुग्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना आर्थिक मदत हवी असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  1. रुग्णाचे आधार कार्ड
  2. रुग्णाचे रेशन कार्ड
  3. रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो
  4. उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी)
  5. आजाराशी संबंधित वैद्यकीय अहवाल
  6. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  7. रुग्णालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर नोंदणीकृत असावे
  8. अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट
  9. अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती

सर्व कागदपत्रे aao.cmrf-mh@gov.in या ईमेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावीत. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 30 जुलै 2025)

  1. मुंबई शहर: 428 रुग्णांना 4 कोटी 01 लाख 15 हजार रुपयांची मदत
  2. मुंबई उपनगर: 392 रुग्णांना 3 कोटी 61 लाख 29 हजार रुपयांची मदत
  3. ठाणे: 1338 रुग्णांना 12 कोटी 10 लाख 10 हजार रुपयांची मदत
  4. पालघर: 153 रुग्णांना 1 कोटी 28 लाख 41 हजार रुपयांची मदत
  5. रायगड: 219 रुग्णांना 1 कोटी 97 लाख 03 हजार रुपयांची मदत
  6. रत्नागिरी: 164 रुग्णांना 1 कोटी 30 लाख 60 हजार रुपयांची मदत
  7. सिंधुदुर्ग: 44 रुग्णांना 57 लाख 79 हजार रुपयांची मदत

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि अन्य सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे कामकाज पारदर्शकपणे चालले आहे आणि यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाईल, असे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
 

Topics mentioned in this article