Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांना किरकोळ पावसाचा अनुभव घेता आला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Live Update) ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याच्या घटना समोर आल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये एका तासात 114 मिमी पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील पावसाचे अपडेट जाणून घ्या.
मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी डॉक्टर तारक यांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांना विरोध केल्याने काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगे यांच्या उपोषणाला आंतरवालीत परवानगी देऊ नये असे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहिले होते.
आषाढी यात्रेत सलग दुसऱ्या वर्षी महाआरोग्य शिबिराचं आयोजन
आरोग्याची वारी , पंढरीच्या द्वारी... या संकल्पनेतून गतवर्षी आषाढी यात्रेतील रुग्ण तपासणीचा विश्व विक्रम झाला. यानंतर यंदा आषाढी वारीत गोपाळपूर , वाखरी, तीन रस्ता आणि 65 एकर अशा चार ठिकाणी शिबीर होणार आहे. आषाढी यात्रेत सलग दुसऱ्या वर्षी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं. या शिबिराच्या नियोजनाची आढावा बैठक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथे घेतली. यावेळी शिवाजी सावंत , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. यंदाच्या वारीत नव्याने आणखी एक शिबिराचे केंद्र वाढवण्यात आले आहे.
पिपाणी चिन्हावरून शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला पत्र
लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे झालेल्या अडचणीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पिपाणी चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी शरद पवार गटाची मागणी आहे. पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेत शरद पवार गटाला काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय न घेतल्यास शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही समोर आलं आहे.
विलंब शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा मोर्चा..
विलंब शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा मोर्चा..
केंद्र सरकारच्या विलंब शुल्काच्या विरोधात आज सांगलीमध्ये रिक्षा संघटनांसह विविध वाहनधारक संघटनेकडून रिक्षा मोर्चा काढण्यात आला आहे. रिक्षा संघटनांकडून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील सहभाग घेत केंद्र सरकारच्या जाचक विलंब शुल्क रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी रु.50 प्रतिदिन विलंब शुल्कचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला विरोध करत रिक्षा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो रिक्षांसह रिक्षा चालक सहभागी झाले होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा हैदोस
पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला. वाकड परिसरात मध्यरात्री पाच ते सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे समाजकंटक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तोडफोडीचे रिल्स बनवल्याची ही माहिती असून वाकड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्याने प्रवाशी संतप्त
एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाल्याने प्रवाशी संतप्त
सकाळी 11.15 चे एअर इंडियाचे मुंबई-दिल्ली विमान उशीरापर्यंत आले नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
संसदेत शपथविधी अन् बाहेर आंदोलन...
पंतप्रधान मोदींसह गडकरी, राजनाथसिंग, चौहानांचा खासदारकीचा शपथविधी, विरोधकांचं संसदेच्या बाहेर आंदोलन, सपाचे खासदार संविधानासह सभागृहात
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसची उद्या दिल्लीत बैठक
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसची उद्या दिल्लीत बैठक
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत उद्या काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री उपस्थित राहतील अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत काँग्रेसचे पुढचं धोरण ठरेल असेही पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतही बैठक पार पडेल अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. काँग्रेसचे आगामी धोरण या बैठकीत ठरेल. आगामी विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा यामध्ये होईल.
अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर रात्रभर सुरू राहणार
अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर रात्रभर सुरू राहणार आहे. मध्यरात्री दीड वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल. यासाठी मंदिर परिसरात भाविकांसाठी व्यवस्था करण्यास सुरूवात झाली आहे.
18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी राहुल गांधी संसदेत दाखल
18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी राहुल गांधी संसदेत दाखल
हृदयविकाराचा धक्का आल्यानं कारचा अपघात
कोल्हापुरात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीची कार थेट पोलवर जाऊन धडकल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली. कोल्हापुरातील जयराज पेट्रोल पंप येथे ही घटना घडली. कारचालक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने ही दुर्घटना घडली. हृदयविकाराचा धक्का आला तेव्हा ही गाडी पेट्रोल पंपावर असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेतील कारचालकाला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी Live...
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live...
18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज संसदेत पार पडत आहे. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडेल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं.
]रिक्षासह, टॅक्सी चालकांकडून 25 जून रोजी कोल्हापूर बंदची हाक
रिक्षासह, टॅक्सी चालकांकडून 25 जून रोजी कोल्हापूर बंदची हाक
वाहनांच्या पासिंगवरील दंड आकारणी रद्द करावी अशी मागणी रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांकडून करण्यात येत आहे. कोल्हापुरात या दंड आकारणी विरोधात रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. उद्या 25 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी रिक्षा व टॅक्सी चालकांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. पासिंगसाठी विलंब शुल्क म्हणून आकारला जाणारा दैनंदिन पन्नास रुपये दंड रद्द करा अशी मागणी रिक्षा व टॅक्सी चालकांची आहे. मंगळवारी 25 जून रोजी या चालकांनी कोल्हापूर शहरातील रिक्षा व टॅक्सी वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा दौरा कोल्हापुरात आहे. आज मध्यरात्रीपासून ते मंगळवारी सायंकाळी पाच पर्यंत सर्व वाहने बंद ठेवण्याचं आवाहन संघटनांतर्फे करण्यात आलेलं आहे. पासिंगसाठी आकारला जाणारा दैनंदिन दंड रद्द करावा यासाठी मोर्चा देखील काढण्यात आलेला होता. आता या चालकांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशी शहरातील सर्व रिक्षा व टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषदेचे आयोजन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये माळी महासंघाच्या वतीने हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व या हक्क परिषदेत विधान परिषद व विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. यात प्रामुख्याने विधान परिषदेच्या 11 जागांमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावं तसेच विधानसभेत राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी असा ठराव या हक्क परिषदेत करण्यात आला आहे. तर जो राजकीय पक्ष विधानसभेसाठी माळी समाजाला उमेदवारी देईल त्याच्यामागे संपूर्ण समाज हा उभा राहणार असून उमेदवारी न देणाऱ्या राजकीय पक्षांवर बहिष्कार घालून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा इशाराही या हक्क परिषदेच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देण्यात आला आहे.