मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाची आहिल्यानगरमधील चौंडीमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याचे सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या (बुधवार, 7 मे) जाहीर करण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या गोष्टींवर असेल भर?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील १२,५०० शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील ४८ विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील ९०२ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना: काँग्रेसच्या अजेंड्यावर सर्जीकल स्ट्राईक ! )
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे त्यांनी सांगितले.
( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? ती घेण्याची वेळ का आली? वाचा सर्व प्रश्नांची उत्तर )
शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.