मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण विविध कारणांनी ढवळून निघाले आहे. राज्यात वाढलेली गुन्हेगारी, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेची झोड उठवत असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'लोकमत' माध्यम समूहाच्या एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांची कोंडी करणारे प्रश्न विचारुन त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच मिश्किलपणे उत्तरे दिली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावरील उत्तराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात वर्णन करा.. असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही सडेतोड एकाच वाक्यात विषय संपवला. दोघांबद्दल एकाच वाक्यात सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. काहीही भरवसा नाही. या वाक्यात दोघांचीही वागण्याची पद्धत आली, काहीही भरवसा नाही.. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अन् प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
यावेळी जयंत पाटील यांनी नागपूरमधील हिंसाचार आणि नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही नितेश राणेंचे कान टोचले. जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. आपल्या बोलण्याने कोणताही वाद होणार नाही, हे बोलले पाहिजे. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.