सागर कुलकर्णी
परभणी शहरात झालेला हिंसाचार आणि याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून शहरात निर्माण झालेला तणाव ते सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूपर्यंत नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
10 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दत्तराव सोपानराव पवार याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतीची विटंबना तसेच तोडफोड करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी जमावाने गर्दी केली, रास्ता रोको केला. काहींनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या दिवशी काही संघटनांनी परभणी शहर आणि जिल्हा बंद पुकारला.
या बंद शांततेत होण्यासाठी पोलिसांनी मिटिंग बोलवली. त्यामध्ये सर्व नियोजन ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरु झाले, त्यामध्ये सात संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याचदरम्यान काही आंदोलकांनी टॉवर जाळण्याचा प्रयत्न केले. त्यानंतर गाड्या, दुकानांची तोडफोड करण्याचे काम जमावाने केले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बारा वाजता परभणीमध्ये 163 कलम नुसार जमाबंदी घोषित केली तसेच अश्रुधुराचा वापर अन् लाठीचार्जही केला. यावेळी काही महिला होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करुन तोडफोड केली तसेच फायली फेकल्या. याचाही संयमाने सामना केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विटंबना करणारा मनोरुग्ण..
एकूण दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांपैकी 51 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी महिलांना नोटीस देऊन घरी सोडले. हे अटक सत्र
सहा वाजेपर्यंत सुरु होते. व्हिडिओमध्ये तोडफोड करणारे दिसत आहेत अशा लोकांवर ही कारवाई करण्यात आली. हा पवार आरोपी आहे तो मनोरुग्ण आहे. 2012 पासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो खरा मनोरुग्ण आहे का यासाठी चार डॉक्टरांची समिती बसवली होती, त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, हा व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं आहे. त्याला दैनंदिन उपचाराची गरज आहे, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे मुळातच सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला अन् त्यात हिंदूविरोधी बोलल्याने ही घटना घडल्याची स्टोरी खोटी आहे. हा व्यक्ती मोर्चामध्ये नसून तो त्याच्या बहिणीच्या घरुन आला. यामध्ये केवळ बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्यांकाविरोधात भाष्य करण्यात आले.संविधानावर कोणीही काही बोलले नाही. कुठेही हिंदूविरोधी दलित अशा प्रकारचे हे प्रकरण नाही. यासंदर्भात पहिल्यांदा ही कारवाई जातीद्वेषातून झाली नाही, तर एका मनोरुग्णामुळे शहराची शांतता बिघडली. कुठल्यातरी उद्वेगाने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. यामध्ये कोटी ८९ लाख रूपये पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
यामध्ये कोंबिंग ऑपरेशनचा मुद्दा समोर आला. मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की कोंबिंग ऑपरेशन सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही चर्चा केली. नंतर सहानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र यामध्ये एक तक्रार पोलीस निरीक्षक अशोक घोरमांड यांनी बळाचा वापर केल्याची माहिती आहे. याची चौकशी करुन त्यांना सस्पेंड केला जाईल. दुसरा मुद्दा म्हणजे वत्सलाबाई मानवते यांना मारहाण करण्यात आली का?यामध्ये त्या स्वतः प्रचंड अग्रेसिव्ह होत्या,त्यांनी महिला पोलिसांवर हल्ला केला. ज्यामध्ये जखमी झालेल्या कॉन्स्टेबलवर उपचार सुरु आहेत.
(नक्की वाचा- BJP vs Congress : संसद परिसरातील अभूतपूर्व गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय)
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे?
आणखी एक आंदोलक आहेत.. सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी.. हे लॉचे शिक्षण घेत होते. मूळचे लातूरचे असून परभणीमध्ये शिक्षण घेत होते. त्यांची वस्तुस्थिती म्हणजे जाळपोळ सुरु असताना त्यांना अटक करण्यात आली होती. दोनवेळा त्यांना कोर्टासमोर उभं करण्यात आले. त्यांना त्यामध्ये पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली का? असा सवाल केला होता, त्यावेळी त्यांनी नाही असं सांगितल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ते पूर्णवेळ कोठडीत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. त्यांच्या पोस्टमार्टमध्ये महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे त्यांना श्वसनाचा त्रास होता. अंगावर
जुन्या जखमा होत्या. तसेच खांद्याजवळचे हाडही तुटले आधी तुटले होते. छातीत जळजळू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले तिथे मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला 10 लाखाची मदत केली जाईल. तसेच ज्या शंका उपस्थित झाल्यात त्यांचे निरसन होईल, त्यासाठी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल. निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी होईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
नक्की वाचा- (हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)