"वयाच्या 12 व्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन येणारा युवक आपला उमेदवार आहे. उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याचे भाग्य एकनाथ शिंदेला मिळालं. कारण यापुर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचा ठराव मांडला, पण अल्पमतातील सरकारला तो अधिकार नसतो. आम्ही पुर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकृतपणे धाराशिव आणि संभाजीनगरचे नामकरण केले.हे बाळासाहेबांचे स्वप्न होते," असं एकनाथ शिंदे म्हणाले. धाराशिवमध्ये अजित पिंगळे आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
"शिवसेना हा चार अक्षरी शब्द आपण जपलाय. धनुष्यबाण आपण जपलाय. बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेंने उठाव केला आणि अनैसर्गिक सरकारचा टांगा पलटी घोडे फरार केला. कारण त्याची गरज होती. आपले सरकार आल्यानंतर १२४ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. महाविकास आघाडीने फक्त 4 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली होती. स्टे देणारे सरकार म्हणून महविकास आघाडीचे नाव होते. विकास विरोधी सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार. विकासाचे मारेकरी म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार. विकासाच्या नावाने बोंबाबोंब. स्वत:ची घरे भरण्यापलिकडे तुम्ही काय केलं? आमचे सरकार आल्यानंतर आम्ही स्वत:चे नाही लोकांचे घर भरण्याचे काम केले," असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
महाविकास आघाडीला इशारा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. "लाडक्या बहिणींनो,तुम्हाला दीड हजारांवर ठेवणार नाही.दीडचे दोन, अडीच, तीन हजार करु, तुम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. महाविकास आघाडीवाले म्हणतात, आमचे सरकार आल्यानंतर योजनेची चौकशी करु. मी तुम्हाला सांगतो, आमच्या नादाला लागू नका, हे आग्यामोहोळ आहे. कुठे चावेल सांगता येणार नाही. लाडक्या बहिणींसाठी एकदा नव्हे १०० वेळा जेलमध्ये जाईल, असा घणाघातही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.