विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापूर आणि सांगलीला जोडणाऱ्या राज्यमार्गावर मालेफाटा येथे आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात पदवीच्या परीक्षेसाठी कोल्हापूरकडे निघालेली एक तरुणी जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे.
कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावरील मालेफाटा येथे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकीने पुढे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. चारचाकी तीन वेळा उलटली आणि रस्त्यावर दूरपर्यंत फरफटत गेली. या अपघातात दिव्या कानिफनाथ भोसले ही तरुणी जागीच ठार झाली. तिच्यासोबत प्रवास करणारी दुसरी तरुणी जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Yavatmal News: शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेतील एका प्रश्नामुळे खळबळ; शिक्षकांनी व्यक्त केला संताप)
परीक्षेसाठी निघाल्या होत्या दोघी
दिव्या आणि तिची मैत्रीण पदवी परीक्षेसाठी कोल्हापूरकडे जात होत्या. लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी भाड्याने चारचाकी घेऊन प्रवास सुरू केला होता, मात्र नियतीने वाटेतच त्यांच्यावर घाला घातला.
गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार
अपघात झाल्यानंतर काही काळानंतर चारचाकी चालकाने सकाळपासून रात्रीपर्यंत अपघात प्रकरणी गुन्हा नोंद होऊ नये यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. मात्र, दिव्या भोसलेच्या नातेवाईकांनी हा दबाव झुगारून दिला. अपघाताचा गुन्हा हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये जोपर्यंत नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
(नक्की वाचा- सोलापूर-कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास; कशी घडली घटना?)
नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे आणि न्यायाच्या मागणीमुळे रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलिसांत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिव्या भोसलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि मित्र-मैत्रिणींवर मोठा आघात झाला आहे.