Nagpur News : जमीन बळकावण्यासाठी काँग्रेस नेत्याचं धक्कादायक कृत्य; अखेर गुन्हा दाखल

या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

काँग्रेस नेता आणि माजी नगरसेवक कमलेश चौधरीने शासकीय जमीन बळकावण्यासाठी सिटी सर्व्हेचे बनावट दस्तऐवज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात काँग्रेस नेता आणि माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

फूटाळा तलाव व त्याच्या कॅचमेंट क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमणासाठी प्रसिद्ध असलेला माजी नगरसेवक कमलेश दिलीप चौधरी याने आता सिटी सर्व्हे कार्यालय क्र. 3, भूमी अभिलेख विभागाचा बनावट दस्तऐवज तयार करून मौजा तेलंगखेडी येथील तब्बल 43.87 लाख चौ.फूट शासकीय जमीन बळकावण्याचा गंभीर प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. 

Advertisement

या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सिटी सर्व्हे कार्यालय क्र. 3 यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. 20 जून 2025 रोजी सदर पोलीस ठाण्यात कमलेश चौधरी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याआधी 29 मे 2025 रोजी, अन्याय निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी कमलेश, त्याची आई मीना आणि भाऊ मुकेश यांनी सादर केलेल्या बनावट दस्तऐवजांविरोधात सिटी सर्व्हे कार्यालयात लेखी तक्रार केली होती.

Advertisement

त्यानंतर कार्यालयाने 17 जून रोजी अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली आहे. आमदार विकास ठाकरे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यासाठी निवेदन सादर केले. एफआयआरनुसार, 43 लक्ष 87 हजार चौ.फूट क्षेत्रफळाची जमीन सिटी सर्वे नंबर 65, मौजा तेलंगखेडीमध्ये असून ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मालकीची आहे. सिटी सर्व्हे कार्यालयाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदींनुसार, या जमिनीत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) आणि ICMR/नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ यांचे हक्क नोंदवलेले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Dr. Prashant Javarkar : मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मानसिक तणावातून आत्महत्या, वैद्यकीय वर्तुळात खळबळ

मात्र, 21 जानेवारी 2025 रोजी, कमलेश चौधरीने सिटी सर्व्हे कार्यालयात अखिव पत्रिकेची प्रत जोडून अर्ज सादर केला होता. या प्रतामध्ये हस्तलिखित स्वरूपात दिलीप दयाराम चौधरी हे या जमिनीचे पट्टेदार असल्याचे भासवले होते आणि ऑनलाइन नोंदींमध्ये हे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, कार्यालयाने तपासणीअंती ही प्रत बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि अर्ज फेटाळून लावला. त्यावेळी गुन्हा नोंदवला गेला नव्हता. ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या पत्रानंतरच पोलिसांत तक्रार करण्यात आली.

या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे. ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात मागणी केली की, कमलेश चौधरीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. "कमलेश चौधरी हा केवळ शासकीय जमीन बळकावत नाही, तर बनावट शासकीय दस्तऐवज तयार करत आहे. हेच बनावट दस्तऐवज तो नागपूर महानगरपालिका, नगर विकास विभाग, तसेच नागपूर सिव्हिल कोर्ट, जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात सादर करून शासकीय व न्याय यंत्रणेला दिशाभूल करत आहे. त्यामुळे त्याला अटक करून संपूर्ण चौकशी होईपर्यंत कोठडीत ठेवावे व MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.

Topics mentioned in this article